बायकोला किती वेळ बघत राहाल? 90 तास काम करा; L&T चेअरमनचं विधान

90 Hours Work Week: लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. रविवारीही काम करावे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 9, 2025, 06:46 PM IST
बायकोला किती वेळ बघत राहाल? 90 तास काम करा; L&T चेअरमनचं विधान title=
आठवड्याचे 90 तास काम

90 Hours Work Week: एन्फोसिसचे सहसंचालक नारायण मूर्ति यांनी 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर भारतासह जगभरात यावर चर्चा झाली. आता आणखी एका बड्या कंपनीच्या संचालकाने जास्त तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रह्मण्यम हे आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी त्यांनी केलेले वक्तव्य देशभरात चर्चेत आलंय. असं त्यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊया. 

लोकांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. रविवारीही काम करावे, असे सुब्रह्मण्यम म्हणाले. सुट्टीच्या दिवशी घरी किती वेळ बायकोकडे पाहत राहाल? असा प्रश्नही त्यांनी विचारला. शनिवारी काम करण्याबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे विधान केले. तसेच या विचित्र विधानाला यशाचा मंत्र देखील म्हटले आहे.  इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वी देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. आता लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष आणखी पुढे गेले आहेत. त्यांनी 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. 

दिवसाला 90 तास काम केले तर मला आनंद 

जर लोकांनी दिवसाला 90 तास काम केले तर मला आनंद होईल, असे ते म्हणाले. तुमची कंपनी अब्जावधी डॉलर्सची आहे. तरीही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही काम करायला लावता, असा प्रश्न लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या अध्यक्षांना विचारण्यात आला.  यावर त्यांनी उत्तर दिले. रविवारी मी माझ्या लोकांना कामावर आणू शकत नाही याचे मला वाईट वाटते. माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले तर मला आनंद होईल. कारण मी रविवारीही काम करतो. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे, असे ते पुढे म्हणाले.

रविवारी तुम्ही बायकोकडे किती वेळ पाहत राहाल?

कर्मचाऱ्यांनी रविवारी घरी वेळ घालवू नये. घरी बसून काय करणार? तू किती वेळ तुझ्या बायकोकडे पाहत राहशील आणि किती वेळ तुझी बायको तुझ्याकडे पाहत राहील? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकांनी रविवारीही ऑफिसमध्ये काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या संपूर्ण संभाषणाची क्लिप रेडिटवर व्हायरल होत आहे. अद्याप एल अँड टी ग्रुपने व्हिडिओवर कोणतेही विधान केलेले नाही.