नवी दिल्ली: विश्वचषकातील आगामी भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या संघाला एक विशेष संदेश दिला आहे. या सामन्यात पाकिस्तानी संघाने फक्त क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करावे, असे इम्रान यांनी म्हटले आहे. येत्या १६ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान ही विश्वचषकातील हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे. याची उत्सुकता आतापासूनच सर्वांना लागली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर रांची येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय खेळाडुंनी शहिदांच्या स्मृतिप्रित्यर्थ लष्करी कॅप परिधान केली होती. या कृतीला पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाक खेळाडुंच्या मैदानात आणि मैदानाबाहेरील कृतीकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.
अशा वातावरणात इम्रान खान पुन्हा एकदा सामंजस्याची भूमिका घेतली आहे. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडुंनी 'जशास तसे' या धोरणाने न वागता केवळ आपल्या खेळावरच लक्ष केंद्रित करावे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचा कर्णधार सरर्फराज अहमद याने भारतीय खेळाडुंना बाद केल्यानंतर वेगळ्याप्रकारे आनंद व्यक्त करण्याची परवानगी सरकारकडे मागितली होती. जेणेकरून रांची येथील सामन्यातील भारताच्या कृतीचे प्रत्युत्तर देता येईल. मात्र, इम्रान खान यांनी आपल्या संघाला अशाप्रकारचे कोणतेही पाऊल उचलण्यास मनाई केल्याचे या अधिकाऱ्याने 'मुंबई मिरर'शी बोलताना सांगितले.
पाकिस्तानी खेळाडुंनी फक्त खेळावर लक्ष केंद्रित करावे. त्यांनी कोणतीही राजनैतिक किंवा आक्रमक कृती करण्याच्या फंदात पडू नये. खेळात राजकारण येता कामा नये. भारतीय संघाने केलेल्या कृतीला प्रत्युत्तर देण्याची गरज नाही, असेही इम्रान यांनी सांगितले.