मुंबई : भारतानं विश्वचषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यात सलामीवर रोहित शर्मा आणि गोलंदाजांनी प्रभावशाली कामगिरी केली. मात्र भारताचा एक महत्त्वाचा शिलेदार आपली छाप सोडण्यात अपयशी ठरतो आहे. संघाच्या विजयाची पायाभरणी करण्याची जबाबदारी ही प्रामख्यानं सलामीवीरांची असते. जेव्हा संघातील सलामीवर मजबूत आणि मोठी सलामी देतात तेव्हा संघावरचं अर्ध ओझं कमी होतं. मात्र जर सलामीच डगमगली तर पुढे सगळ्या खेळाडूंनाच विजासाठी संघर्ष करावा लागू शकतो.
रोहित शर्मा आणि शिखर धवन भारताच्या या दोन सलामीवीरांपैकी रोहितनं शर्मानं पहिल्याच सामन्यात शतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर दुसरीकडे शिखर धवन विश्वचषकासाठी इंग्लंडच्या भूमीत उतरल्यापासून संघर्ष करताना दिसतोय. धवन दोन्ही सराव सामने आणि पहिल्या सामन्यात फ्लॉप ठरला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सराव सामन्यात धवन २ धावांवर बाद झाला. बांगलादेखविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात तर धवन १ धाव काढून तंबूत परतला. तर विश्वचषकातील पहिल्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तो ८ धावा करुन बाद झाला.
आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रबाडान १४६ प्रती ताशी किलोमीटरनं चेंडू टाकला आणि धवनची बॅट अक्षरश: तुटली. यानतंर धवननं आपली बॅट बदलली खरी मात्र त्यानंतर काही वेळातच रबाडानं त्याला बाद केलं. चेंडूला तडकावताना पायांची चुकीची हालचाल आणि डावखुऱ्या गोलंदाजांसमोर धवन संघर्ष करताना दिसतोय.
गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर तीन एकदिवसीय मालिकेत धवन १२० धावाच करु शकला होता. यामध्ये त्याला एकही शतक किंवा अर्धशतक झळकावता आलं नव्हतं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ११२ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ५५, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत १८८ तर भारतात झालेल्या कांगारुंविरुद्ध मालिकेत त्यानं १७७ धावा केल्या आहेत.
आपला पहिला सामना हा मनोबल खचलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असल्यानं टीम इंडियाला विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. मात्र आता सामना हा धोकादायक कांगारुंशी आहे. यामुळे एकाही खेळाडूनं जर जबाबदारीनं खेळ केला नाही. तर मात्र भारताचं काही खरं नाही. यामुळेच धवन कमॉन...आता तुला आपल्यातील क्लास दाखवावाच लागेल.