World Cup 2023 Updates: 2023 हे वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेटची मेजवाणी घेऊन आलंय. आयपीएल (IPL 2023), एशिया कप (Asia Cup) आणि एकदिवसीय वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) अशा मोठ्या स्पर्धा या वर्षात खेळवल्या जातायत. यात सर्वात महत्त्वाची समजली जाणारी वर्ल्ड कप स्पर्धा वर्षअखेरीस होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते संघ खेळणार याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम आठ संघ निश्चित झाले आहेत. पण विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचं आयर्लंड संघाचं स्वप्न मात्र पावसामुळे भंगलं आहे.
आयर्लंड संघाचं स्वप्न भंगलं
वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न घेऊन आयर्लंड (Ireland) संघ बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) सामन्यात चेम्सफोर्ड मैदानात उतरला. पण दुर्देवाने या सामन्यावर पावसाने पाणी फिरवलं आणि हा सामनाच रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्याने आर्यलँडचं वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं. मंगळवारी खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पहिली फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 50 षटकात 9 विकेट गमावत 246 धावा केल्या. याला उत्तर देताना आयर्लंडने 16 षटकात 3 विकेट गमावत 65 धावा केल्या. पण त्याचवेळी पावसाने एन्ट्री केली आणि त्यानंतर सामनाच रद्द करण्यात आला.
हे आठ संघ निश्चित
वर्ल्ड कप 2023 साठी आठ संघ निश्चित झाले आहेत. यात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश आहे. यात दक्षिण आफ्रिका संघाला अगदी शेवटच्या क्षणाला एन्ट्री मिळाली. वेस्टइंडिजला मागे टाकत दक्षिण आफ्रिकेने अंतिम आठ संघात जागा पटकावली. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडविरुद्धची एकदिवसीय मालिक जिंकली, याच जोरावर त्यांना वर्ल्ड कपचं तिकिट मिळालं.
श्रीलंकाही स्पर्धेतून बाहेर
दुसरीकडे श्रीलंका क्रिकेट संघही वर्ल्ड कप स्पर्धेत थेट एन्ट्री करण्यास असमर्थ ठरला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवीस यामालिकेत श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी केली होती. आता 18 जून ते 9 जुलैदरम्यान क्लालिफाईंग सामने खेळवले जाणार असून यातून दोन संघ वर्ल्ड कपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघाला आणखी एक संधी आहे. भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर 2023 दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे.
भारतात तयारीला वेग
भारतात 2016 नंतर म्हणजे तब्बल सात वर्षांनी आयसीसी (ICC) स्पर्धेचं आयोजन होत आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेत जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्यावर. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना नेहमीच हायव्होल्टेज सामना असतो. पण हा सामना कुठे खेळवायचा याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादीमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमध्ये खेळवला जाणार आहे. तर उपान्त्यफेरीचा एक सामना मुंबईतल्या वानखेडे मैदानावर होण्याची शक्यता आहे.