Paneer and channa salad: पनीर भारतातील लोकप्रिय डेरी उत्पादन मानले जाते. पनीर आणि चणे (chickpea) हे दोन्ही प्रथिनं (Protin) आणि फायबरचे (Fiber) उत्कृष्ट स्रोत आहेत. हे वजन कमी करण्यास मदत करतात. चण्यांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणारे गुणधर्म असतात. त्यामुळे चण्यांचे सेवन हे शरिराच्या चांगल्या आरोग्यासाठी वरदान आहे. तसेच पनीर हे फक्त चविलाच नाही तर आपल्या आरोग्यासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे. कच्च्या पनीरमधून मिळणारे प्रथिने शरीराला ऊर्जा देतात आणि शरीरातील थकवा कमी करतात. एवढेच नाही तर कच्च्या पनीरमधून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होण्यासाठी मदत होते. कच्चे पनीर खाल्ल्यास जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे जेवण कमी प्रमाणात खाल्ले जाते आणि याचा फायदा वजन कमी करण्यासाठी होतो. तर जाणून घ्या ही खास सॅलडची रेसिपी.
पनीर: 2 कप (चिरलेले)
उकडलेले चणे: अर्धा कप
काळी मिरी पावडर: 1/4 टीस्पून
काळे मीठ: आर्धा टीस्पून
चाट मसाला: 1/4 टीस्पून
लिंबाचा रस: 1 टीस्पून
कापलेला हिरवा कांदा: आवश्यकतेनुसार
प्रथिनांनी भरपूर चना आणि पनीर सॅलड तयार करण्यासाठी सर्वप्रथम चणे रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी कुकरमध्ये चणे ठेऊन तीन शिट्ट्या काढा आणि गॅस बंद करा. चणे शिजल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढा. त्यातच पनीरचे चिरलेले तुकडे टाका. तुम्हाला तळलेला पनीर आवडत असेल तर तो आधी थोडा रोस्ट करा आणि त्यानंतर टाका. मग त्यात काळी मिरी पावडर, काळे मीठ, आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार सॅलडमध्ये लिंबाचा रस टाका आणि चांगलं मिक्स करा. नंतर त्यात चिरलेला हिरवा कांदा टाका. आता तुमचं हेल्दी पनीर चणे सॅलड तयार आहे. शेवटी सॅलडवर हिरवीगार कोथिंबीर घाला आणि सर्व्ह करा.
हे ही वाचाः लहान मुलांना आवडीने चहा पाजताय? त्या अगोदर नुकसान समजून घ्या
टीप: हे सलाड हलकं, हेल्दी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तुम्ही जेवणात किंवा स्नॅक म्हणून याचा आनंद घेऊ शकता.