www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यातील परिवहन सेवा डबघाईला आली आहे. परिवहनवर जवळपास ९० कोटींचं कर्ज आहे. पण सत्ताधारी आणि पालिका प्रशासनान याकडे कानाडोळा करतंय. तर नेते मंडळींना यावरून राजकारण सुचतंय. त्यामुळे 'टीएमटी'ची सेवा बंद पडते की काय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय.
ठाणे 'टीएमटी'मध्ये ३१३ बसेस आहेत. त्यामध्ये आठ ते दहा वर्षांपेक्षा जास्त जुन्या ९० बसेस आहेत. त्या कदाचित कधी दुरुस्तच होऊ शकत नाहीत. तर मोठ्या दुरस्ती खर्चाच्या ७५ बसेस आहेत. त्यामुळे 'टीएमटी'च्या फेऱ्या प्रवाशांसाठी कमी पडतात. बसेस कमी, त्यामुळे फेऱ्या कमी. परिणामी उत्पन कमी यामुळे 'टीएमटी'वर जवळपास ९० कोटींचं कर्ज आहे. आता लवकरच नवीन ४०० बसेस येतील आणि 'टीएमटी'चं कर्ज कमी होईल, असा दावा 'टीएमटी' प्रशासन करतंय.
तर या गंभीर प्रश्नावरही नेते मंडळींना राजकारणाची झिंग चढलीय. 'टीएमटी'च्या परिस्थिती सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर विरोधकांचे आरोप फेटाळून लावत महापौरांनी लवकरच बसच्या संख्येत वाढ करणार असल्याची माहिती दिली.
सत्ताधारी विरोधकांच्या राजकारणाला ठाणेकर वैतागले आहेत. रोजच्या दगदगीच्या प्रवासामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. 'टीएमटी'ची सेवा बंद होण्याच्या मार्गावर आहे. 'टीएमटी' व्यवास्थापनाची उदासीनता आणि नेत्यांचे स्वार्थी राजकारणामुळे हा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता कमीच आहे. पण तोपर्यंत यासर्व बिकट परिस्थितीत ठाणेकर पिसला जाणार हे नक्की.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.