www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
माळशेज घाटात संरक्षक कठडे बांधण्यात सरकारने उशीर केला आहे. त्यामुळे हा आजचा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक निष्पाप जीवांचे प्राण गेले आहेत. या अपघाताबाबत सरकारचा तीव्र निषेध करतो, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केलेय. सार्वजनिक बांधकाम विभाग या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, एस टी अपघातातील अनेकांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.
ठाणे आगरातून अहमदनगरच्या दिशेने निघालेल्या एसटीला गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात भीषण अपघात झाला. एका नागमोडया वळणावर टेम्पोशी धडक टाळण्याच्या प्रयत्न करण्याच्या नादात बसवरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी टेम्पोने धडक दिल्याने बस १५० फूट दरीत कोसळली. या अपघातात ३० जण ठार झाल्याची भीती व्य़क्त होत आहे. आतापर्य़ंत ६ जणांचे मृतदेश सापडलेत आहेत. एसटी चालक आणि वाहक अजूनही बेपत्ता आहेत.
अपघातातील अनेकांना वाचविण्यासाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. एसटीचे अधिकारी आणि अग्नीशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. पोलीस आणि अग्नीशमन दलाचे जवान स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मदतकार्य करीत आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीची दोन तुकडे झाले आहेत. मुरबाडचे आमदार किसन काथोरे यांनी आपल्या कार्य़कर्त्यांसह घटनास्थळी मदतकार्य सुरू ठेवलेय.
१२ ते २६ जण जखमी झाले असून, त्यांना जवळच्याच मुरबाड आणि टोकावडे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना ठाण्याच्या सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. घटनास्थळी मुरबाड तालुक्यातील वैद्यकीय पथके रवाना झाली आहेत.
हेल्पलाईन नंबर
एसटी अपघात हेल्पलाईन नंबर - १८००२२१२५०, एस टी विभाग - ०२५२ ४२२२२६० , ०२५२ ४२२२००,
मदतीसाठी (एसटी अधिकारी, समाजसेवक ) - ९२७४१४४८५३, ९४२३०८७६०३, ७५८८०१३५९९, ९२७१५५१७५१
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.