माळशेज घाटात एसटीला भीषण अपघात, २७ ठार

माळशेज घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला. टेम्पोनं धडक दिल्यानं बस दरीत कोसळल्याने या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले आहेत. एसटीमध्ये ४५ प्रवासी होते. यातील ४३ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 3, 2014, 07:44 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाणे-अहमदनगर एसटी बसला माळशेज घाटात भीषण अपघात झालाय. माळशेज घाटात एसटी २०० फूट दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. टेम्पोनं धडक दिल्यानं बस दरीत कोसळल्याने या अपघातात २७ जणांचा मृत्यू झाला. तर ६ जण जखमी झाले आहेत. एसटीमध्ये ४५ प्रवासी होते. यातील ४३ जणांची ओळख पटली आहे. दरम्यान, टेम्पो चालकाला अटक करण्यात आली आहे.
समोरून येणाऱ्या लाकडाने भरलेल्या ट्रकने एसटीला धडक दिली. त्यामुळं एसटी २०० फूट दरीत जाऊन कोसळली. हा अपघात एवढा भीषण होता की बसचे दोन तुकडे झाले आहेत. अपघातातल्या जखमींना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड आणि टोकावडे रूग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर गंभीर जखमींना थेट ठाण्याला नेण्यात आले आहे. नागाठाणे आगाराची ही बस असून बस अहमदनगरकडे जात असताना हा अपघात झालाय. दरम्यान, पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली.
काही प्रवाशांना अपघात स्थळाच्या जवळ असलेल्या खासगी रुग्णालयांमध्येही दाखल करण्यात आले आहेत. एसटी प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी उपस्थित असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू होतं. एसटीमध्ये ४५ प्रवासी होते. एसटी चालक आणि वाहक यांच्या या अपघातात मृत्यू झाला. बसमध्ये १८ पुरूष, १९ महिला आणि एका ५ वर्षांच्या मुलीचा समावेश होता.
अपघातात ४ जण गंभीर जखमी असून २ जण जखमी आहेत. त्यांच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, माळशेज घाटात संरक्षक कठडे बांधण्यात सरकारने उशीर केला आहे. त्यामुळे हा आजचा अपघात झाला आहे. या अपघातात अनेक निष्पाप जीवांचे प्राण गेले आहेत. या अपघाताबाबत सरकारचा तीव्र निषेध करतो, अशी तीव्र प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केलेय. सार्वजनिक बांधकाम विभाग या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.