दलालांनी लाटली तब्बल पाच कोटींची जमीन

६० वर्षे शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची जमीन, सरकार दरबारी एका इस्त्रायली नागरिकाच्या नावावर झाल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 30, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, रायगड
६० वर्षे शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याची जमीन, सरकार दरबारी एका इस्त्रायली नागरिकाच्या नावावर झाल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यात उघडकीस आलाय. जमिनींचे गैरव्यवहार आणि सरकार दरबारी दलालांची कशी चलती आहे, हेच या निमित्तानं दिसून आलंय... झी २४ तासचा हा एक्झक्लुझिव्ह रिपोर्ट...
रायगड जिल्ह्यात जमिनींतून निघतोय सोन्याचा धूर... ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस हाय-वे’वर पाच कोटींची जमीन दलालांनी लाटलीय... इथली मोक्याच्या ठिकाणची शेतजमीन आता एका इस्त्रायली नागरिकाच्या मालकीची झालीय. खालापूर तालुक्यात ठाणेन्हावे गावात, मुंबई पुणे एक्सप्रेस वेजवळ अगदी मोक्याच्या जागी ही जमीन आहे. ही सात एकर जागा स्वातंत्र्यापूर्वी टिळक परिवाराच्या नावे होती. मात्र, साठ वर्षांपूर्वी ही जमीन कूळ अखत्यारीत शमशुद्दीन शेख या शेतकऱ्याला कसण्यासाठी देण्यात आली. सध्याच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत आहे सुमारे पाच कोटी रुपये. याची कल्पना जमीन कसणाऱ्या शेख यांनाही नसावी. यामुळेच दलालांनी आपला डाव साधला आणि ही जमीन देशात कधीही वास्तव्यास नसलेल्या एका इस्त्रायली नागरिकाच्या नावे झाली. सरकारी अधिका-यांच्या आशीर्वादानेच हा प्रकार घडल्याचा आरोप जागेचे मूळ मालक जयंत टिळक यांनी केलाय.
त्यावेळी पनवेलचे तत्कालीन प्रांताधिकारी होते पांडुरंग मगदूम. या कार्यक्षम मगदूम महाशयांना या इस्त्रायली नागरिकाचे नाव जमिनीवर लावण्याची खूपच घाई होती. एलकाना भास्तेकर याचे नाव लावण्याचे प्रकरण तहसीलदारांनी निकाली काढल्यानंतर, मगदूमांनी विशेषाधिकाराचा वापर करत २५ दिवसांत जमीन भास्तेकर यांच्या नावे करण्याचे लेखी आदेश दिले होते.
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहत असलेल्या दलालांनी लगेचच पॉवर ऑफ अटर्नी करुन घेत, खरेदी विक्रीचा धंदाही सुरु केला. या प्रक्रियेला मालक शेख यांनी हरकत घेतली, मात्र त्यांच्याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आलं. ज्या दुय्यम निबंधकाकडे हरकत केली होती, त्यांच्याच सहीने जमिनीचे खरेदीखत करण्यात आले. याबाबत या दुय्यम निबंधकांना `झी २४ तास`ने विचारणा केली. तेव्हा त्यांची अवस्था ही अशी झाली.
जमीन खरेदी-विक्रींची हातचलाखी रायगडात कशी सुरु आहे. याचं हे एक उदाहरण आहे. दलाल आणि सरकारी अधिकारी यांच्या अभद्र युतीने शेख यांच्यासारखे अनेक शेतकरी मात्र नाहक भूमीहीन होत आहेत. पण कुंपणच शेत खात असल्यानं दखल घेणार कोण, हाच खरा प्रश्न आहे.