ग्लास्गो: ग्लास्गो इथं सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट करत भारताचं नाव रोशन केलं असतानाच भारतीय अधिकाऱ्यांमुळं भारताची मान शरमेनं खाली गेली आहे. हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी कुस्तीचे पंच विरेंद्र मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
स्कॉटलंड इथल्या ग्लास्गो इथं कॉमनवेल्थ स्पर्धा सुरु असून या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तब्बल ६१ पदक जिंकून भारताचा झेंडा रोवला. मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी बेजबाबदार वर्तन करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्कीच केली आहे. कुस्तीचे पंच विरेंद्र मलिक यांच्या विरोधात एका महिला कर्मचाऱ्यानं असभ्य वर्तन केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास स्कॉटलंड पोलिसांनी मलिक यांना अटक केली आहे.
तर मद्यधूंद अवस्थेत विना परवाना वाहन चालवल्याप्रकरणी भारतीय ऑलिंपिक महासंघाचे सचिव राजीव मेहता यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर नेमके काय कलम लावण्यात आलंय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर भारतीय ऑलिपिंक महासंघानं अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र खेळाडूंसोबत जाणाऱ्या अधिकाऱ्यांचं वर्तन नेहमीच बेजबाबदारपणाचं असतं. खेळाडूंऐवढंच महासंघाचे अधिकारीही क्रीडा स्पर्धेच्या नावाखाली परदेश दौऱ्यावर जातात. यावर लगाम लावण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.