सुवर्णपदक हातात घेऊन बिंद्राची कॉमनवेल्थमधून निवृत्ती

कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याचं हे अभिनव बिंद्रा याचं शेवटचं वर्ष ठरलंय. ‘10 मीटर एअर रायफल’च्या व्यक्तिगत स्पर्धेत बिंद्रानं सुवर्ण पदक पटकावलंय... यानंतर त्यानं आपण खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. 

PTI | Updated: Jul 26, 2014, 03:46 PM IST
सुवर्णपदक हातात घेऊन बिंद्राची कॉमनवेल्थमधून निवृत्ती title=

ग्लासगो : कॉमनवेल्थ खेळांमध्ये सहभागी होण्याचं हे अभिनव बिंद्रा याचं शेवटचं वर्ष ठरलंय. ‘10 मीटर एअर रायफल’च्या व्यक्तिगत स्पर्धेत बिंद्रानं सुवर्ण पदक पटकावलंय... यानंतर त्यानं आपण खेळातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं. 

अभिनव बिंद्रानं सुवर्ण पदकासाठी याआधी चार वेळा प्रयत्न केला होता... पण, तो अयशस्वी ठरला. पण, कॉमनवेल्थ खेळांमध्ये दुहेरी सामन्यात तीन सुवर्ण पदकांसहीत एकूण नऊ पदकं हस्तगत केली होती. यंदा, फायनल राऊंडमध्ये आपल्या खेळाचं सर्वोत्कृष्ठ प्रदर्शन करत बिंद्रा कोणत्याही चुका करण्यापासून सावध राहिला. तो बॅरी बुडोन शूटिंग सेंटरमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेच्या क्वालिफिकेशनच्या तिसऱ्या स्थानावर होता. 

ऑलिम्पिकमध्ये व्यकिगत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या बिंद्रानं एकूण 205.3 अंकांसहीत खेळांमध्ये एक नवा रेकॉर्ड कायम केलाय. ‘आयएसएसएफ’चे नियम लागू असणारं हे पहिलंच कॉमनवेल्थ आहे. या नियमांनुसार, केवळ शेवटच्या टप्प्यातले अंक विचारात घेतले जातात. तर यामध्ये क्वॉलिफिकेशनचा स्कोअर जोडला जात नाही.

बिंद्रानं स्पर्धेनंतर भारतीय पत्रकारांशी बोलताना आपल्या संन्यासाची घोषणा केली. ‘हा माझा शेवटचा कॉमनवेल्थ असेल. पाच कॉमनवेल्थमध्ये नऊ पदकं माझ्यासाठी पुरेशी आहेत... आणि हे पदक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण त्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती... आणि मला आनंद आहे की मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहचण्यासाठी यशस्वी झालो आणि मला हवं असलेलं फळही मिळालं’’

रिओ 2016 मध्ये होणारा ऑलिम्पिक गेमही तुझ्यासाठी शेवटचा असेल का? या प्रश्नावर बिंद्रानं ‘मी सध्या केवळ एकाच गोष्टीवर लक्ष देतो... याबद्दलचा निर्णय मी नंतर घेईन’ असं उत्तर दिलंय. 

निवृत्ती घेतल्यानंतर काय करणार? या साहजिक प्रश्नावर उत्तर देताना मात्र बिंद्रानं पत्रकारांचाच पाय ओढला. ‘पत्रकारिता सोप्पं काम असतं. निशानेबाजीत करिअर संपल्यानंतर मी पत्रकार बनू शकतो’ असं त्यानं म्हटलं. त्यानंतर मात्र त्यानं, आपण विश्व चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं. काही महिन्यातच विश्व चॅम्पियनशिपचीही सुरुवात होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.