www.24taas.com, यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)
सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘आमच्या रेषा बोलतात भाषा’ हा चित्रकार-व्यंगचित्रकारांचा परिसंवाद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करण्यात आला होता. या परिसंवादासाठी उद्धव ठाकरे येथे आले होते.
उद्धव म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याच्या ताकदीवर प्रत्येक माणसातील वाघ जागा केला. मराठी माणसाला बळ दिले. शिवसेनाप्रमुखांनी साहित्यनिर्मिती केली असेल-नसेल, पण त्यांनी स्वाभिमाननिर्मिती केली हे लक्षात ठेवा. परिसंवाद सुरू होण्यापूर्वी त्यांनी उपस्थित साहित्यिक व साहित्य रसिकांशी संवाद साधला. संमेलनात आणि संमेलनापूर्वी वाद हवेतच कशाला? हा आपल्या मराठीचा, मातृभाषेचा उत्सव आहे. आम्हा राजकारण्यांच्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका आहेत, पण आमचे मतभेदांचे व्यासपीठ वेगळे आहे. ते हे व्यासपीठ नव्हे. हा आपल्या मातृभाषेचाच नाही तर आपणा सर्वांच्या आईचा उत्सव आहे. मग अशावेळी वाद हवेतच कशाला, असा सवाल उद्धव यांनी यावेळी केला.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक चंद्रशेखर कंबार यांनी ज्यांना कन्नड भाषा येत नाही त्यांनी कर्नाटकातून निघून जावे, असे म्हटले होते. अशी हिंमत आपल्यात आहे का, असा सवाल उद्धव यांनी केला. कंबार यांच्या विधानावर तेव्हा कुणीच प्रतिक्रिया दिली नव्हती, पण शिवसेनाप्रमुखांनी ‘सामना’ त अग्रलेख लिहिला होता. याला तुम्ही साहित्यनिर्मिती मानता की नाही ठाऊक नाही, पण ही स्वाभिमान निर्मिती होती हे तुम्हाला मान्य करावेच लागेल, असे उद्धव म्हणाले.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणालेत, साहित्यिकांमध्ये मतभेद जरूर असावेत, पण त्यात असुरी प्रवृत्ती नसावी. साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकारणी असावेत की नसावेत हा वाद बाजूला ठेवा आणि तुम्ही राजकारणात या, तुमचे स्वागत आहे, असे आवाहन आठवले यांनी केले. आम्ही संमेलन उधळवून लावू असे जाहीर केले होते. मात्र, व्यासपीठाला बाळासाहेबांचे नाव दिलेत. त्यामुळे असे काही आता होणार नाही, असे आठवले यांनी म्हटले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांना शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांचा संग्रह ‘फटकारे’ हे पुस्तक भेट देण्यात आले.