सत्तेचं एक वेगळंच समीकरण पुण्यात पाहायला मिळालं. मनसेनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. आणि जुन्नर नगरपालिकेत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केलं.
जुन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. जुन्नर नगरपालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. मुदत संपल्यानं शिवसेनेचे नगराध्यक्ष अनिल मेहेर यांनी राजीनामा दिला होता. जुन्नर नगरपालिकेच्या १७ पैकी ९ नगरसेवक शिवसेनेचे आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि मनसेचे २ नगरसेवक आहेत. मात्र सेनेचे दोन नगरसेवक गैरहजर असल्यानं, शिवसेनेच़ं संख्याबळ ७ वर आले. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. अखेर मनसेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दिनेश दुबे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.
राष्ट्रवादीनं या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला असला तरी, खरी लढत मनसे आणि शिवसेनेतच झाली. या लढतीत मनसेने राष्ट्रवादीच्या मदतीनं शिवसेनेवर मात केलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.