www.24taas.com, कोल्हापूर
‘जयप्रभा’ स्टुडिओवर महापालिका, चित्रपट महामंडळ किंवा इतर सिने व्यावसायिकांचा कोणताही हक्क नसल्याचं सांगत कोल्हापूरच्या दिवाणी कोर्टानं अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा दावा फेटाळून लावलाय. यासोबतच जयप्रभा स्टुडिओ ही हेरिटेज वास्तू नसून ती लता मंगेशकर यांची खाजगी मालमत्ता असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलंय.
महापालिकेनं जयप्रभा स्टुडिओ या वास्तूचा हेरिटेज ग्रेड ३ मध्ये समावेश करण्याचा ठराव संमत करून त्यावर हरकती मागवल्या होत्या. पण, या ठरावावर शासनाचा अंतिम निर्णय मात्र अजूनही झालेला नाही. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओ ही अजूनही हेरिटेज वास्तू नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय.
चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान ठरलेल्या जयप्रभा स्टुडिओची विक्री करण्याला अखिल भारतीय चित्रपट महामंडळानं आणि कोल्हापूरकरांनी विरोध दर्शवला होता. लता मंगेशकर यांनी या स्टुडिओच्या जागेचा व्यापारीकरणासाठी वापर करू नये, स्टुडिओतील वस्तूंना नुकसान पोहोचवू नये, महाराष्ट्र शासन व महापालिकेने स्टुडिओची मिळकत संपादन करावी या मागण्यांसाठी चित्रपट मंडळानं केल्या होत्या. पण, जयप्रभा ही खाजगी मालमत्ता असून तिच्या मिळकतीत चित्रपट महामंडळाचा कोणताही हक्क नसल्याचं न्यायालयानं म्हटलंय.
दरम्यान, आपण जयप्रभा वाचवण्यासाठीचा लढा सुरुच ठेवणार असल्याचं चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी म्हटलंय.