राज ठाकरेंचा फुसका बार; इंजिन धावलंच नाही

राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकांतही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 18, 2012, 02:29 PM IST

www.24taas.com, नांदेड
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणातल्या शहरी भागांपुरतीच मर्यादित असल्याचं नांदेड महापालिका निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होतंय. राज ठाकरे आणि मनसे नेत्यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं पुढच्या निवडणुकांतही मनसेच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो, हे वास्तवही नेत्यांना कळू लागलंय.
राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरी भाग सोडला तर ग्रामीण भागात चमकदार कामगिरी करु शकत नाही, असंच चित्र गेल्या काही निवडणूक निकालांतून पुढे आलंय. गेल्या काही दिवसांत झालेल्या महापालिका निवडणुकांपैकी मुंबई, पुणे, नाशिक आणि कल्याण डोंबिवली या चार महापालिका वगळता इतर ठिकाणी मनसेला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतरच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीतही इंजिन फारस धावलं नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या भिवंडी, परभणी, लातूर आणि नुकत्याच झालेल्या नांदेड या चार महापालिकांत तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही. मालेगावमध्ये दोन आणि मीरा भाईंदरमध्ये अवघी एक जागा मनसेला मिळाली. या आकडेवारून मुंबई पुण्याबाहेर मनसेचं अपयश उठून दिसतंय.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. तसंच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले. मात्र, हे यश शहरीभागातलं होतं. ग्रामिण भागातली पक्षाची कामगिरी मात्र तसुभरही सुधारली नाही. नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीनं मनसेच्या इंजिनाची धाव मुंबई, पुण्याच्या पुढे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. राज ठाकरे कोर्ट-कचेरी आणि देवदर्शनाच्या निमित्तानं तेवढे ग्रामीण भागात जातात. त्यामुळे ग्रामीण भागात मनसे वाढणार कशी? आणि महाराष्ट्राची एकहाती सत्ता मिळणार तरी कशी? याचं उत्तर राज ठाकरेच देऊ शकतील.