www.24taas.com, झी मीडिया, मोशेंग्लाबाख
ज्युनियर भारतीय महिला हॉकी टीमने जर्मनी येथे पार पडलेल्या ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केलीय. ब्राँझ मेडलकरता झालेल्या मॅचमध्ये भारतीय मुलींनी इंग्लंडचा पेनल्टी शुटआऊटमध्ये ३ विरूद्ध २ असा पराभव केला आणि पहिल्यांदाच ज्युनियर हॉकी वर्ल्ड कपमध्ये ब्राँझ मेडल पटकावण्याचा विक्रम रचला.
भारतीय ज्युनियर मुलींनी जर्मनीतील हॉकी वर्ल्ड कप टूर्नामेंटमध्ये ब्राँझ मेडल जिंकत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ‘थर्ड प्लेस’करता झालेल्या या मॅचमध्ये भारताने पेनल्टी शूट आऊटमध्ये इंग्लंडला ३ विरूद्ध २ गोलने पराभूत केलं आणि इतिहास रचला. इंग्लंडविरूद्ध तिसऱ्या स्थानाकरताच्या मॅचमध्ये भारतीय महिलांनी सुरूवातीलाच आघाडी घेतली. १८ वर्षीय राणीने १३ व्या मिनिटाला भारताकरता पहिल्या गोलची नोंद केली. भारताने आपली ही आघाडी फर्स्ट हाफपर्यंत टिकवून ठेवली.
मात्र, सेकंड हाफमध्ये इंग्लंडच्या ऍना तॉर्मनने ५५ व्या मिनिटाला गोल करत इंग्लंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली. मॅचच्या अखेरच्या क्षणांमध्ये दोन्ही टीम्सनी प्रतिस्पर्धी गोलपोस्टवर हल्ले चढवले. मात्र, त्या हल्ल्यांचं गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आलं. अखेरीस मॅचच्या निकालाकरता पेनल्टी शूट आऊटचा आधार घ्यावा लागला. इंग्लंडने पहिली पेनल्टी शुट आऊट गमावली आणि राणीने पहिल्या पेनल्टी शूट आऊटचं गोलमध्ये रूपांतर करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही टीम्सचे मिळून सहा पेनल्टी स्ट्रोक अपयशी ठरले. अखेरीस एमीली डेफ्रॉएंडने इंग्लंडला पेनल्टी शूट आऊटमध्ये बरोबरी साधून दिली. त्यानंतर पूनम राणीने अखेरची संधी गमावली. पेनल्टी स्ट्रोकमध्येही बरोबरी कायम राहिल्याने सडन डेथच्या पर्यायाचा अवलंब करण्यात आला. त्यात राणी आणि नवनीत कौरने गोल नोंदवले. तर इंग्लंडच्या ऍना तॉर्मनला गोल करण्यात अपयश आलं आणि ब्राँझ मेडलवर भारतीय ज्युनियर्सच नाव कोरलं गेलं. भारतीय महिलांच्या या विक्रमी कामगिरीवर खूष होऊन हॉकी इंडियाने भारतीय कोचसह टीममधील प्रत्येक खेळाडूकरता एक लाखाचे बक्षिस जाहीर केलं असून सपोर्ट स्टाफला पन्नास हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.