रोडरोमियोंना कंटाळून तरुणीची आत्महत्या

नाशिकमधून संतापजनक बातमी..... शहरात खुलेआम रोडरोमियो महिलांची छेड काढतायत. सातपूर भागातल्या एका तरुणीनं टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jun 27, 2013, 08:37 PM IST

www.24taas.com, मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक
नाशिकमधून संतापजनक बातमी..... शहरात खुलेआम रोडरोमियो महिलांची छेड काढतायत. सातपूर भागातल्या एका तरुणीनं टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय. महत्त्वाचं म्हणजे सहा महिन्यातली टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून झालेली ही दुसरी आत्महत्या आहे.
सातपूरमध्ये जाधव संकुलात राहणारी ही प्रीती जाधव... कॉलेजमधली ही हुशार विद्यार्थिनी आता फक्त फोटोफ्रेम आणि आठवणीतच राहणार आहे. तिनं घरी गळफास लावून आत्महत्या केली..... त्याचं कारण म्हणजे सातपूर परिसरातले टवाळखोर.... इंग्लिशच्या पेपरच्या दिवशी एका मुलानं तिचा बळजबरीनं हात धरला. त्यानंतर पुन्हा चार पाच मुलांनी असाच त्रास दिल्याचं तिनं सुसाईट नोटमध्ये लिहिलंय. डीएडच्या दुस-या वर्षाचं शिक्षण घेणा-या प्रीतीला गेली अनेक वर्षं हे टवाळखोर त्रास देत होते, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांनी सांगितले.
जानेवारी महिन्यात सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणा-या एका विधवा महिलेनं टवाळखोरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक कोंडीराम फोफरे यांना निलंबित करण्यात आलं होतं. मात्र तरीही नाशिकच्या महिला सुरक्षित नसल्याचं समोर आलंय. टवाळखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी स्थानिक महिला रोहिणी सोनवणे आणि अमृता पवार यांनी केली आहे.
पोलीस प्रीतीच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांची चौकशी करून या प्रकरणाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र शहरात राजरोसपणे महिला आणि तरुणींची छेड काढली जातेय. पोलिसांचा गुंडांना धाक राहिलाच नाही, हेच पुन्हा सिद्ध झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.