मुंबई : त्या दोघांनी दहा वर्षांत एकमेकांची तोंडं पाहिली नाहीत... एकेकाळी दोघांमध्ये कितीही जिव्हाळा असला तरी कालांतरानं ते एकमेकांचे हाडवैरी झाले. आज तब्बल दहा वर्षांनी त्या दोघांच्या भेटीचा योग येणार होता... पण एका ऐतिहासिक क्षणाला महाराष्ट्र मुकला...
महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण येता येता राहिला... दोघांमधलं अंतर फक्त शंभर पावलांचं... पण तेवढं अंतर पार करता करता पावलं जड झाली... आणि एक वारी टळली... नारायण राणे मातोश्रीच्या मैदानात प्रचारासाठी उतरले. एकेकाळी श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीवर साहेब जाणार, अशी वर्दी सूत्रांकडून सकाळीच आली होती... त्यामुळे तमाम महाराष्ट्राचे डोळे, मीडियाचे कॅमेरे वांद्र्यात मुक्काम ठोकून होते.
मातोश्रीही खडबडून जागी झाली होती, आणि डोळ्यांत तेल घालून खडा पाहारा सुरू होता. गेल्या दहा वर्षांत जे घडलं नाही, ते घडणार होतं... मौका भी था... दस्तूर भी... वांद्रे पोटनिवडणुकीच्या प्रचाराचं निमित्त होतं. त्यामुळे कुणीही राणेंची वाट अडवणारं नव्हतं. त्या ऐतिहासिक क्षणाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती. पण राणेंची प्रचारयात्रा कलानगरच्या प्रवेशद्वारावरुनच वळली. तब्बल दहा वर्षांनी राणेंचे पाय मातोश्रीला लागता लागता राहिले.
मुळात नारायण राणे म्हणजे प्रहार... संघर्ष.... राडे... आणि धूमशान.... शिवसेनेत असतानाही आणि शिवसेना सोडल्यावरही राणेंचा निवडणुकीतला प्रचार गाजला तो राड्यांमुळेच... अख्ख्या कोकणात या राड्यांनी धूमशान घातलं. दहा वर्षापूर्वीच्या मालवण पोटनिवडणुकीत राणेंना कोकणी माणसानं सहानुभूती दाखवली आणि राणे विजयी झाले. पण, नंतर या राड्यांना कोकणी माणूसही वैतागला.
त्याचाच परिणाम गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिसला. गेल्या दहा वर्षांत मालवणातल्या गड नदीखालून बरंच पाणी वाहून गेलंय. त्यामुळे मिठीनदीकाठच्या लोकांशी सलगी करताना राणेंनी प्रचाराची स्टाईल संपूर्णपणे बदलल्याचं आतापर्यंत तरी दिसतंय. राणेंना प्रचारात कुठलाही राडा नकोय. वांद्रा मतदारसंघात कोकणी माणसांचा मोठा पट्टा आहे, त्यामुळे वांद्र्याशी भावनिक नातं असल्याचंही राणे सांगतात.
राणेंना काळानं बरंच काही शिकवलंय... म्हणूनच राड्यांची भाषा जाऊन आता विकासाची भाषा आलीय. पुढच्या काळात राणेंचा रस्त्यावरचा राडा कदाचित दिसणार नाही. पण मातोश्रीच्या मुलूखमैदानात राणे लढणार म्हटल्यावर कितीही नाही म्हटलं तरी संघर्ष हा या निवडणुकीचा स्थायीभाव राहणारच आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.