मुंबई : गर्भातील मुलाचा सौदा करणाऱ्या परमार दाम्पत्याविरोधात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीड लाख रुपयांत आएशा खानने मुलाची विक्रि केली. तसेच मूल खरेदी करणाऱ्या परमार दाम्पत्यावरही गुन्हा दाखल केलाय.
विरार पूर्वेला राहणारी आएशा खान या महिलेने चक्क गर्भातील मुलाची विक्रि केली. आई या शब्दालाच तिनं काळिमा फासला. गर्भात असतानाच तिनं स्वतःच्या पोटचं बाळ दीड लाखांना विकलं. आएशा खाननं नोटरी करून स्वतःचं नाव बदलून घेतलं आणि आठव्या महिन्यात पूनम परमार म्हणून ती गणेश नर्सिंग होममध्ये दाखल झाली.
१५ जानेवारी २०१५ रोजी तिनं एका मुलाला जन्म दिला आणि ते मूल परमार दाम्पत्याला दिलं. मात्र दोन महिन्यानंतर ती पुन्हा आपलं मूल परत मागायला आली. मूल परत मिळालं नाही तर जीवाचं बरं वाईट करण्याची धमकीही देऊ लागली. यामुळं परमार दाम्पत्याने तिला मूल परत दिलं. मात्र आपली आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार परमार दाम्पत्यानं आता केलीय.
आएशा खानला दोन मुली आहेत. तिसरीही मुलगीच झाली तर तिच्या पालनपोषणाचा खर्च करता येणार नाही म्हणून गर्भातच तिनं आपल्या बाळाचा सौदा करून टाकला. या व्यवहारात गणेश नर्सिंग होम रूग्णालयातले डॉ. काटेही सहभागी असल्याचा आरोप परमार दाम्पत्यानं केलाय. मात्र हा आरोप डॉक्टरांनी फेटाळलाय.
विरार पोलिसांनी या प्रकरणी मूल विकणा-या आएशा खानवर आणि मूल खरेदी करणा-या परमार दाम्पत्यावरही गुन्हा दाखल केलाय. तसंच डॉक्टरांचीही चौकशी सुरू केलीय.
हा सगळाच प्रकार गंभीर आहे. भारतात सरोगेट मदर प्रकाराला परवानगी आहे. मात्र गरीबीमुळं आपल्या पोटचा गोळाही विकण्याची पाळी मातेवर कशी येते, हेच यातून दिसून येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.