'कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची' - उद्धव

कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय.  

Updated: Jul 12, 2015, 04:27 PM IST
'कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची' - उद्धव title=

मुंबई: कुणाला स्वबळाची खुमखुमी येतेय तर कुणाला सरकार पाडण्याची अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय. मुंबईच्या रंगशारदा सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचा गणेशोत्सव मंडळांसोबत मार्गदर्शन मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना गणेशोत्सव मंडळांसोबत असल्याची ग्वाही यावेळी उद्धव यांनी उत्सव समितीला दिलीय. तसंच गणेशोत्सव इथं नाही तर पाकिस्तानात साजरा करायचा का? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. 

मुंबईच्या नालेसफाईवरुन चिंता व्यक्त करणाऱ्यांनी तुंबलेल्या दिल्लीकडे लक्ष द्यावं, तिथं सत्ता कोणाची आहे असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे.

रविवारी गणेशोत्सव समिती आणि महापालिकेच्या बैठकीत उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सव मंडळांना पाठिंबा दर्शवला. रस्त्यावर बसून नमाज पढणाऱ्यांविरोधात कोणीही कोर्टात गेले नाही, पण आपल्या उत्सवांविरोधात आपलीच लोकं कोर्टात जातात अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

 गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला उत्सव आहे तो दाऊदचा उत्सव नाही की त्याला विरोध करायला हवा असा चिमटाही त्यांनी काढला. गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक कार्याकडेही लक्ष द्यावं, असंही त्यांनी सांगितलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.