Ajit Pawar NCP Vidhan Sabha : विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी मुस्लीम समाजाला सर्वाधिक जागा देण्याचं ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. अजित पवारांचा पक्ष जागा वाटपात मिळणा-या एकूण जागांपैकी 10टक्के जागांवर मुस्लीम उमेदवार देणार आहे.. अल्पसंख्यांक उमेदवार देत मताधिक्य बळकट करण्याची तयारी अजित पवारांच्या पक्षाकडून सुरु आहे.. अजित पवार गटाकडून सध्या विधानसभा मतदारसंघांची चाचपणी सुरु आहे..
मुंबईत चार आणि MMR रिजनमध्ये 1 अश्या पाच जागांवर मुस्लीम उमेदवार दिसणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. मुंबईतील वांद्रे, मुंबादेवी, अणुशक्ती नगर आणि शिवाजीनगर या मतदारसंघात अजित पवारांचा पक्ष मुस्लीम उमेदवार देण्याची शक्यता आहे. तसंच कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातही मुस्लीम चेहऱ्याची निवड होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच बीड शहर, मालेगाव, धुळे आणि जळगाव अशा विधानसभा मतदारसंघातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुस्लिम उमेदवार असण्याची चिन्ह आहेत. भाजप आमदार गेल्या काही दिवसांपासून मुस्लीम समाजाविषयी वादग्रस्त विधानं करताना दिसतायत.. यावरुनच नाराज असलेल्या अजित पवारांनी फडणवीसांसमोरच कान टोचले होते. नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानांचा फटका महायुतीला निवडणुकीत बसू शकतो अशी अजित पवारांच्या पक्षाला भीती आहे.. त्यामुळेच अजित पवारांनी मुस्लीम कार्ड वापरल्याची चर्चा सुरु आहे...
महायुतीच्या जागावाटपाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार आहेत. 24 आणि 25 सप्टेंबरला अमित शाह महाराष्ट्रात येणार आहेत. 24 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरच्या रामा हॉटेलमध्ये महायुतीची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहेत. संभाजीनगरला होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह निवडक नेत्यांची अमित शाहांसोबत बैठक असणार आहे. दोन दिवसीय दौऱ्यात अमित शाह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतून रिपाइंला 10 ते 12 जागा देण्यात याव्यात, अशी मागणी रिपाइंचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलीय.. तर जागावाटपासंदर्भात 23 सप्टेंबरला रिपाइंचं शिष्टमंडळ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार असल्याचंही रामदास आठवलेंनी म्हटलंय..