रेल्वे भाडेवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीचे आंदोलन

केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडीचा फटका फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या भाडेवाढीविरोधात आज जोरदार आंदोलनं झाली. मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलनं झाली. तर काँग्रेसने भाडेवाढीविरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 21, 2014, 09:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडीचा फटका फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. या भाडेवाढीविरोधात आज जोरदार आंदोलनं झाली. मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलनं झाली. तर काँग्रेसने भाडेवाढीविरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिलीय.
तोट्यात असलेल्या भारतीय रेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढणं गरजेचं होतं. त्यासाठी प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यात वाढ होणार हे नक्की होतं. मात्र रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशाचं अक्षरशः कंबरडं मोडलं गेलंय.
यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आज आंदोलनं केली. प्रवासी भाडेवाढीत मुंबईकरांचा मासिक पास जवळपास १३० टक्के ते १८७ टक्क्यांनी वाढलाय. त्यामुळे मुंबईकर संतापलेत.
काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने या भाडेवाढीविरोधात सीएसटीवर आंदोलनं केली. अच्छे दिन राहीले दूर सरकारने जनतेवरच बोजा टाकलाय अशी टीका या दोन्ही पक्षांनी केलीय. सरकारने तातडीने ही दरवाढ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
काँग्रेसने या भाडेवाढीविरोधात सविनय कायदेभंगाची हाक दिलीय. सोमवारी काँग्रेसचे कार्यकर्ते सीएसटी ते ठाणे हा प्रवास विनातिकीट करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दरम्यान, मुंबईची एक वेगळी ओळख निर्माण करणारे आणि संपूर्णतः रेल्वेवर अवलंबून असणा-या डब्बेवाल्यांनी या भाडेवाढीविरोधात आंदोलन केलं.
इतके दिवस महागाईच्या नावानं खडे फोडणा-या भाजप नेत्यांची भाषा आता अर्थातच बदललीये. आधीच्या सरकारनं केलेली घाण आम्ही साफ करत आहोत, असं खासदार किरीट सोमय्या सांगतायत.
मुंबईचे कैवारी असं बिरूद मिरवणारे शिवसेना आणि मनसे हे पक्षही गप्प आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत इतक्या लवकर अपघात घडायला नको होता असं सांगत अनेकदा कठोर निर्णय देशासाठी घ्यावे लागतात असं म्हणून भाडेवाढीचं समर्थनही केलं.
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र या भाडेवाढीवर तुर्तात मौन बाळगणंच पसंत केलंय. यावर नक्की बोलेन, पण आत्ता नाही, असं सांगत त्यांनी वेळ मारून नेली.
भाडेवाढीची अपरिहार्यता असल्याचं सरकार सांगत असलं तरी सरकारच्या अच्छे दिनाच्या वाद्याला मात्र सुरूवातीलाच धक्का पोहोचलाय हे नक्की.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.