कधी होणार २ हजारची नोट चलनातून बाद...

पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता दोन हजारच्या नवीन नोटांचा साठा करणाऱ्यांना सरकार दणका देऊ शकते. अशी साठवून ठेवण्याचा विचार करणा-या मंडळीसाठी एक वाईट बातमी आहे. पाच वर्षानंतर दोन हजारची नवी नोटही चलनातून बाद होईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत, सीए आणि पत्रकार एस गुरुमूर्ती यांनी केला आहे.  

Updated: Dec 12, 2016, 09:22 PM IST
 कधी होणार २ हजारची नोट चलनातून बाद...  title=

मुंबई : पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्यानंतर आता दोन हजारच्या नवीन नोटांचा साठा करणाऱ्यांना सरकार दणका देऊ शकते. अशी साठवून ठेवण्याचा विचार करणा-या मंडळीसाठी एक वाईट बातमी आहे. पाच वर्षानंतर दोन हजारची नवी नोटही चलनातून बाद होईल असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विचारवंत, सीए आणि पत्रकार एस गुरुमूर्ती यांनी केला आहे.  

विशेष म्हणजे २ हजारची नवीन नोट बाजारात आणण्याच्या निर्णयावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित होत असतानाच गुरुमूर्ती यांनी हा दावा केला आहे.

एस गुरुमूर्ती यांनी इंडिया टुडे या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली असून या मुलाखतीमध्ये त्यांनी नोटाबंदीवर भाष्य केले आहे.  एक हजारची नोट चलनातून बाद झाल्यावर दोन हजारची नोट बाजारात आणण्याच्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांनीदेखील प्रश्न उपस्थित केले होते. तर अन्य विरोधी पक्षांनीही या निर्णयावर टीका केली होती. भ्रष्टाचार आणि काळा पैशावर २ हजारची नवी नोट आल्याने निर्बंध कसा बसणार असा प्रश्न केंद्र सरकारला विचारण्यात येत होता.

एक हजारची जुनी नोट रद्द झाल्यावर सरकारने तात्पुरता तोडगा म्हणून दोन हजारची नवी नोट बाजारात आणली होती. आगामी ४ ते ५ वर्षात २ हजारची नवी नोटही रद्द होईल असे भाकित त्यांनी वर्तवले आहे. २ हजारची नोट रद्द झाल्यावर जनतेच्या भारतीय चलनावर विश्वासाला धक्का बसणार नाही का असा प्रश्न गुरुमूर्ती यांना विचारण्यात आला. 

यावर गुरुमूर्ती म्हणाले, पाचशे आणि एक हजारच्या नोटांसारखी दोन हजारची नोट थेट रद्द होणार नाही. पण त्याऐवजी कमी दराच्या नोटा चलनात आणल्या जातील. भविष्यात पाचशे रुपयाची नोट ही सर्वात मोठी नोट असेल. त्याखालोखाल २५०, २०० आणि १०० रुपयांची नोट असेल असे गुरुमूर्ती यांनी सांगितले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीवर नाराजी व्यक्त केली होती. 

नोटाबंदीमुळे जनतेच्या भारतीय चलनावरील विश्वासाला तडा गेल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबाबत केंद्र सरकारने सध्या गोपनीयता बाळगली आहे. दोवन हजारची नोट रद्द झाली तरी जनतेचा सरकारवरील आणि भारतीय चलनावरील विश्वासाला तडा जाणार नाही असा दावा केला जात आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच रोखीने होणा-या व्यवहार कमी करुन डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी ११ सवलती जाहीर केल्या होत्या. या निर्णयामुळे साहजिकच जनता डिजिटल व्यवहारांकडे वळेल आणि दोन हजारच्या नोटेचे महत्त्व कमी होईल असाही एक अंदाज वर्तवला जात आहे.

गुरुमूर्ती हे संघातील विचारवंत म्हणून ओळखले जातात. केंद्र सरकारमधील महत्त्वाच्या विषयांवर त्यांचे मत जाणून घेतले जाते. त्यामुळे गुरुमूर्ती यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.