Saif Ali Khan Attacker Enters India Through River: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करुन त्याला गंभीर जखमी करणाऱ्या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमिन फकिर याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असून त्याला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. शरीफुल भारतात घुसण्यासाठी सात महिन्यांपूर्वी दावकी नदी ओलांडून मेघालयात पोहोचला होता. यानंतर सीम कार्ड खरेदी करण्यासाठी त्याने पश्चिम बंगालमधील रहिवाशाचं आधार कार्ड वापरलं होतं असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने दिलं आहे.
30 वर्षीय शरीफुलला सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर तीन दिवसांनी ठाण्यातून अटक केली आहे. चोरीच्या उद्देशाने वांद्रे येथील सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या शरीफुलने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे की, बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर शरीफुलने आपलं नवा बदलून बिजॉय दास ठेवलं होतं.
प्राथमिक चौकशीत आढळून आलं आहे की, फकीर ज्या सिमकार्डचा वापर करत होता तो पश्चिम बंगालमधील खुकुमोनी जहांगीर शेख या नावाने नोंदणीकृत होता. पोलीस सूत्रांचा हवाला देत, 'द इंडियन एक्सप्रेस'ने वृत्त दिलं आहे की फकीरने सीमकार्ड मिळविण्यासाठी शेखच्या आधार कार्डचा वापर केल्याचा संशय आहे. तो काही आठवडे पश्चिम बंगालमध्ये फिरला आणि स्वतःसाठी आधार कार्ड बनवण्याचा प्रयत्नही केला, परंतु तो त्यात अयशस्वी झाला.
'द इंडियन एक्सप्रेस'ने वृत्त दिले आहे की, फकीरने पोलिसांना सांगितले की तो बांगलादेशात बारावीपर्यंत शिकला होता आणि नोकरीच्या शोधात भारतात आला होता. त्याने मेघालयातील भारत-बांगलादेश सीमेवर असलेली दावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केल्याचा दावा केला. येथे तो बिजॉय दास या बनावट ओळखपत्राने गेला होता.
बंगालमध्ये काही आठवडे घालवल्यानंतर, तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला. फकीरने कोणतीही कागदपत्रे लागणार नाही अशाच नोकऱ्या शोधल्या. रिपोर्टनुसार, अमित पांडे नावाच्या कामगार कंत्राटदाराने ठाणे आणि वरळी परिसरातील पब आणि हॉटेलमध्ये घरकामाचं काम मिळवून देण्यासाठी फकीरला मदत केली.
सुरुवातीला, फकीरने पोलिसांना सांगितलं की तो कोलकाता येथील रहिवासी आहे. तथापि, त्याच्या कॉल रेकॉर्डची तपासणी करताना, अधिकाऱ्यांना बांगलादेशातील नंबरवर अनेक फोन कॉल आढळले. फकीरने बांगलादेशातील त्याच्या कुटुंबाला कॉल करण्यासाठी मोबाइल अॅप्सचा वापर केला होता, असं त्यांनी सांगितलं.
त्यानंतर पोलिसांनी आरोपीला त्याच्या कुटुंबातील एखाद्याला फोन करायला लावला. "त्याने त्याच्या भावाला फोन केला आणि त्याचे शाळेतील लिविंग सर्टिफिकेट पाठवण्यास सांगितलं. त्याच्या भावाने ते (प्रमाणपत्र) फकीरच्या मोबाइल फोनवर पाठवले. हा कागदपत्र तो बांगलादेशी नागरिक असल्याचे सिद्ध करण्यासाठी एक भक्कम पुरावा आहे," असं अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी, आरोपीने जवळच्या दुसऱ्या बॉलिवूड सुपरस्टारच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. पण कुत्रे भुंकू लागल्याने त्याला यश आलं नाही. सोमवारी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं होतं की, फकीरने सैफ अली खानवर त्याच्या अपार्टमेंटमध्ये चाकूने वार केल्यानंतर इमारतीच्या बागेत दोन तास लपून बसला होता