दिपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या कॉलेज कॅम्पसमध्ये सध्या ड्रेस कोडबाबत जोरदार चर्चा सुरुय. एरव्ही कोणता ड्रेस घालायचा याबाबत चर्चा करणारे आता कोणता ड्रेस नाही घालायचा याबाबत चर्चा सुरु झालीय.
मुंबईतल्या नामांकीत सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये थेट शॉर्ट कपडे घालण्यावरच बंदी आलीय. कॉलेज प्रशासनने नुकतेच हे परिपत्रक जारी केलंय त्यानुसर रीब जिन्स (फाटलेली जीन्स) ,शॉर्ट स्कर्ट, स्लीव्हलेस हे कॉलेजमध्ये घालून येण्यास बंदी असून ड्रेसकोडमध्येच कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ही बातमी पसरताच या नियमांची मुलींमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली असून याबाबत संमिश्र मते व्यक्त केली जातायत.
अत्यंत तोकडी कपडे मुली घालत असल्याने कॉलेजमध्ये डिसेंट वातावरण राहत नसून अनेक प्राध्यापकांनी याबाबत तक्रार केल्यानंतर कॉलेजने हा निर्णय घेतल्याचे प्राचार्यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितले.
ड्रेस कोडबाबत नियमावली तयार करणारे सेंट झेव्हीअर्स हे मुंबईतले एकमेव कॉलेज नाही. अनेक कॉलेजेसमध्ये शॉर्ट कपडे घालून येण्यास मनाई असून काही ठिकाणी तर संध्याकाळी सात नंतर मुलींनी कॉलेज कॅम्पसमध्ये थांबण्यावरही बंदी घालण्यात आलीय.
कॉलेज कॅम्पस म्हणजे हवी ती फॅशन करण्याचे स्वातंत्र्य अशी मुलांची धारणा असल्याने कपडे घालण्याबाबत बंधने मुला मुलींना नकोयत. पण असे असले तरी कॉलेजचे स्वातंत्र्य कुठपर्यंत याचा विचार विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघांनीही करायला हवा.