मुंबई : शिवसेनेचे स्वबळावर लढण्याच्या तयारीचे संकेत दिलेत. त्यासाठी 19 सप्टेंबरला राज्यातील सर्व पदाधिका-यांची महत्त्वाची बैठक होत आहे. तर जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपची उद्य़ा मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे.
शिवसेनेनं राज्यात स्वबळावर लढण्याच्या तयारीचे संकेत देऊन भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 19 तारखेला शिवसेनेची महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातल्या सर्व प्रमुख नेते आणि पदाधिका-यांना या बैठकीला हजर राहण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिलेत.
शिवसेनेनं स्वबळाची चाचपणी सुरू केल्याचे संकेत मिळतायत. औरंगाबादमधल्या सर्व नऊ जागांच्या तयारीला लागण्याचे आदेश मातोश्रीवरून पदाधिका-यांना देण्यात आलेत. आज औरंगाबादमधल्या इच्छुकांना मातोश्रीवर बोलावण्यात आलंय. या बैठकीला जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुखांनाही बोलावण्यात आलंय. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांतील शिवसेना पदाधिका-यांच्या मॅरेथॉन बैठका 'मातोश्री'वर सुरू आहेत.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी आजच्या पोटनिवडणूक निकालाचं निमित्त करून भाजपला कानपिचक्या दिल्यात. महाराष्ट्रात बाळासाहेबांचीच लाट आहे. हे निकाल बघून भाजपनं जमिनीवर यावं आणि एकत्र लढावं, असं कदम म्हणाले. उद्धव ठाकरे हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
शिवसेना-भाजपमध्ये युतीवरुन तणाव वाढलाय. किती कोणाला जागा द्यायच्या यावर एकमत होत नाही. भाजप नेते जाहीररित्या जागांबाबत भाष्य करीत असल्याने शिवसेनेच्या गोठात प्रचंड नाराजी आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे सांगितले. त्यानंतर भाजप बॅकफुटवर आलेय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल होणार असून मुंबईतील भाजप नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपांसंबधी चर्चा करणार आहेत.
शिवसेना-भाजप युतीबाबत प्रचंड तणाव निर्माण झालाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला १३४ जागा न सोडण्याचा निर्णय घेतलाय. तसे त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवले आहे. दरम्यान, भाजप नेते माधव भंडारी यांनी युतीबाबत बोलणी थांबली असल्याचे विधान केल्याने उद्धव ठाकरे कमालीचे नाराज असल्याचे पाहायला मिळालेय. भंडारी यांना उद्धव ठाकरे यांनी आदरणीय नेते म्हणत चिमटाही काढला.
दरम्यान, पोट निवडणुकीत मोदी फॅक्टर अपयशी ठरल्याने भाजपच्या गोठात धास्तीही वाढलेय. तसेच भाजप-सेना युतीतील तणाव वाढल्याने केंद्रीय मंत्री आणि भाजपनेते नितीन गडकरी यांच्या उपस्थित दिल्लीत प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे यांची चर्चा झाली. मात्र, ही चर्चा अपूर्णच राहीली. उद्या यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे युतीच्या जागावाटपाबाबत काहीही निर्णय झालेला नाही. त्यातच उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शाह मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबईतील भाजप नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन जागावाटपांसंबधी चर्चा करणार आहेत. त्यामुळे युतीतील जागा वाटपाचा तिढा उद्या सुटतो का? याकडे लक्ष आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.