शरद पवारांचा राजकीय खेळ कुणाला कळला?

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचा पराभव झाला, परंतु भाजपप्रणित एनडीएलाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर...? अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय चाल महत्त्वाची ठरणार आहे.

Updated: Feb 1, 2014, 12:02 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचा पराभव झाला, परंतु भाजपप्रणित एनडीएलाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर...? अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय चाल महत्त्वाची ठरणार आहे.
शरद पवार म्हणे उजव्या हातानं जे करतात, ते डाव्या हातालाही कळत नाही... सध्याचं पवारांचं जे राजकारण सुरूय, ते काँग्रेसवरील दबावतंत्र मानलं जातंय. यूपीएमधील तृणमूल काँग्रेस, द्रमुक हे घटक पक्ष आधीच काँग्रेसची साथ सोडून गेलेत. राष्ट्रीय लोकदलाचे अजित सिंह देखील यूपीएतून बाहेर पडलेत. 
आता नॅशनल कॉन्फरन्सचे अब्दुल्ला पितापुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे देखील काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत की का, असं दिसतंय. त्यामुळंच या प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रवादी पुढचं पाऊल काय उचलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे सध्या 42 पैकी 19 खासदार आहेत. त्याशिवाय माकपचे 9 आणि भाकपचे 2 खासदार प. बंगालमधून 2009 मध्ये निवडून आलेत. तामिळनाडूतील 39 खासदारांपैकी करणानिधींच्या द्रमुकचे 18, तर जयललितांच्या अण्णा द्रमुकचे 9 खासदार आहेत.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या बिहारमध्ये 40 पैकी 20 खासदार जेडीयूचे आहेत. तर उत्तर प्रदेशच्या 80 जागांपैकी 23 खासदार मुलायम सिंगांच्या सपाकडे आणि 20 खासदार मायावतींच्या बसपाकडे आहेत.
ओरिसात 21 पैकी 14 जागांवर नवीन पटनायकांच्या बिजू जनता दलाचे खासदार विजयी झालेत. महाराष्ट्रातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 खासदार आहेत. म्हणजेच या प्रादेशिक पक्षांकडे आजमितीला 143 खासदार आहेत.
निवडणुकीनंतर त्रिशंकू संसद अस्तित्वात येणार असेल तर प्रादेशिक पक्षांची ही ताकद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सध्याचा राजकीय कल लक्षात घेता, कोणत्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं दिसत नाहीत.. भाजपप्रणित एनडीएचे सर्वाधिक खासदार निवडून येण्याची शक्यता आहे.
मात्र बहुमताचा 272 चा आकडा गाठण्यासाठी नरेंद्र मोदींना या प्रादेशिक पक्षांची मदत घेणं अपरिहार्य ठरणार आहे. अशा नाजूक राजकीय स्थितीत शरद पवारांचा रोल निर्णायक ठरणार आहे.
अन्य प्रादेशिक पक्षांची एकत्र मोट बांधण्याची पॉवर पवारांमध्ये आहे. ममता, जयललिता, मुलायमसिंग, फारूख अब्दुल्ला यांच्याशी पवारांचे चांगले संबंध आहेत. त्यांना एनडीएत सामावून घेऊन सरकार बनवण्याच्या दृष्टीने पवारांची मोदींना मदत होऊ शकते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.