www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
भाजपच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची गोव्यात निवड झाल्यानंतर ते प्रथमच मुंबईत दाखल झाले आहे. मोदी एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार असले तरी मनसेबाबत त्यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अचानक भेट घेण्याची शक्यता आहे.
भारतीय लोकशाहीचा प्रवास, त्यातील स्थित्यंतरे, व्यवस्था बदलांच्या चर्चांपासून आजवर झालेल्या विविध प्रयोगांच्या चिंतनाचा लेखाजोखा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या `बियाँड अ बिलिअन बॅलट्स` या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीस येणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने मोदी मुंबईत आलेत.
निवडणुकीच्या राजकारणात विविध टप्प्यांवर प्रस्थापित राजकीय पक्षांपासून ते काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यवस्थेतील बदलांसाठी केलेल्या प्रयत्नांचे विश्लेषणात्मक विवेचन त्यात आहे. लोकांना केवळ सरकारमध्ये एका राजकीय पक्षाऐवजी दुसरा राजकीय पक्ष असा बदल नको असून, व्यवस्थेत बदल हवा आहे, या भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या विधानाचा धागा पकडत डॉ. सहस्त्रबुद्धे यांनी हा विषय पीएच.डी.साठी अभ्यासला. याकरिता भारताच्या कानाकोपर्यां त हिंडतानाच काही प्रमुख देशांतील व्यवस्थांचाही अभ्यास त्यांनी केला. याचाच गोषवारा पुस्तकरुपाने प्रकाशित होत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची धुरा सोपविण्यात आल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी प्रथमच मुंबईत येत आहेत. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मोदी `लोकशाही मार्गाने सु-शासन` या विषयावर भाष्य करणार आहेत. भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
दरम्यान, मुंबईत मोदी दाखल होताच त्यांचे स्वागत भाजप नेते गोपिनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मोदींच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मोदी काय बोलणार? याचीच उत्सुकता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.