मुंबई पालिका निवडणूक; शिवसेना-भाजपचे धर्मयुद्ध पेटले

करो या मरो या इराद्यानंच शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेच्या रणमैदानात उतरले आहेत. शिवसेनेने थेट भाजपच्या सेनापतींनाच आव्हान दिले आहे. येत्या काळात हा सामना आणखी रंगतदार होणार आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 7, 2017, 11:44 PM IST
मुंबई पालिका निवडणूक; शिवसेना-भाजपचे धर्मयुद्ध पेटले title=

मुंबई : करो या मरो या इराद्यानंच शिवसेना आणि भाजप मुंबई महापालिकेच्या रणमैदानात उतरले आहेत. शिवसेनेने थेट भाजपच्या सेनापतींनाच आव्हान दिले आहे. येत्या काळात हा सामना आणखी रंगतदार होणार आहे. 

कौरव कोण, पांडव कोण म्हणत शिवसेना-भाजपचं धर्मयुद्ध पेटले आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत ही युद्धभूमी धगधगती ठेवावी लागणार आहे. आणि प्रसंगी धारातीर्थी पडण्यासाठी शिवसैनिकांना तयारही करावं लागणार आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी प्रचारात हेच काम जोमानं सुरू केले आहे. अजून भात्यातली शस्त्रं उघड व्हायचीयत, त्याआधीच भाजपचं हुकमी अस्त्र असलेल्या मोदींच्याच मुद्द्याला शिवसेनेनं हात घातला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी मोदी मुंबईत येणार की नाही हे भाजपच्या नेत्यांनाही माहीत नाही, पण उद्धव ठाकरेंनी या रणसंग्रामात थेट मोदींनाच कुरुक्षेत्रात येण्याचं आव्हान दिलंय. निवडणुकांसाठीचं रण पेटलं की रस्ते, पाणी, आरोग्य हे मुद्दे बासनात जातात, लढाया लढल्या जातात त्या मतदारराजाच्या भावनांना हात घालत आणि शिवसेना तर यामध्ये सुरुवातीपासूनच तरबेज आहे.

गेल्या महापालिका निवडणुकांआधी बाळासाहेब निष्प्रभ ठरतील असं वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केलं होतं, त्यानंतर शिवसैनिक पेटून उठला आणि मुंबई महापालिकेवर भगवा फडकला. आता शिवसेनेला बंडखोरांची धास्ती वाटतेय, त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसैनिकामधला अंगार पेटता ठेवण्यासाठी, अशी वक्तव्यं करावीच लागणार आहेत. शिवसेनेच्या या आक्रमकपणावर भाजप मात्र शांत आहे. मोदी तो दूर की बात, फडणवीसही काफी है, असा भाजपचा पवित्रा आहे.

मोदींची सभा मुंबईत झाली, तर शिवसेनेच्या प्रचाराला आणखी धार येईल. हुतूतूच्या या खेळात समोरच्याला आत घेऊन जास्तीत जास्त घेरायचं आणि  मग पाय पकडत झडप घालायची, ही शिवसेनेची रणनिती आहे. मोदी आलेच आणि तरीही भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही, तर मोदींच्या निष्प्रभतेचा शंख शिवसेना जोरदार वाजवणार आणि मोदी आले नाहीत तर आम्हाला घाबरुन आले नाहीत, याचाही डंका पिटणार हे नक्की. मोदी या मैदानात उतरणार की नाही, हे मोदींनाच माहीत, पण त्यासाठीचा चक्रव्यूह रचण्याची तयारी शिवसेनेनं आतापासूनच सुरू केली आहे.