राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू

 उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जाचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 12, 2017, 06:33 PM IST
 राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी करण्याचं काम सुरू title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई :  उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर राज्यातील शेतकरी कर्जाचा अभ्यास राज्य सरकारने सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अर्थ विभागाकडून मागवण्यात आली आहे.

या माहितीद्वारे राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची आणि त्यांच्यावर किती कर्ज थकीत आहे याची यादी तयार केली जात आहे. राज्यात 1 कोटी 36 लाख 97 हजार थकबाकीदार शेतकरी आहेत.

राज्य सरकारकडून जी माहिती जमा केली जात आहे त्यात

- प्रत्येक जिल्ह्यात किती थकबाकीदार शेतकरी आहेत
- त्यांची थकबाकीची रक्कम किती आहे
- कर्ज कोणत्या कारणासाठी काढले होते
- त्या विभागातील पिक पॅटर्न आणि सिंचनाची व्यवस्था
- शेतकऱ्यांना कर्जाचा किती फायदा झाला आहे

 

 

याचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील कर्जमाफीनंतर राज्य सरकारवर कर्जमाफी करण्यासाठी दबाव वाढत असताना उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या पॅटर्नचा अभ्यास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती. 

त्या पार्श्वभूमीवर राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती, त्यांची स्थिती याचाही अभ्यास केला जात आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत ज्या-ज्या राज्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, त्या पॅटर्नची माहिती, त्या राज्यात कर्जमाफीचा शेतकऱ्यांना झालेला फायदा अथवा तोटा याचाही अभ्यास राज्य सरकारकडून केला जात आहे.

 येत्या दोन महिन्यात हा सर्व अभ्यास पूर्ण झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत काय करायचे यावर सरकार विचार करणार आहे.