मरण अगदीच स्वस्त झालंय?

कुर्ल्यातल्या भीषण अग्निकांडानंतर सुस्त यंत्रणांना खडबडून जागं करणारं, 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे हे विशेष संपादकीय...

Updated: Oct 17, 2015, 09:00 PM IST
मरण अगदीच स्वस्त झालंय? title=

मुंबई : कुर्ल्यातल्या भीषण अग्निकांडानंतर सुस्त यंत्रणांना खडबडून जागं करणारं, 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे हे विशेष संपादकीय...
 
मुंबईत जगणं महाग झालंय आणि मरण अगदीच स्वस्त झालंय... कुर्ल्यातल्या हॉटेलात गॅस सिलेंडर स्फोटात 8 निष्पाप जीवांचा गेलेला बळी, दुर्दैवानं हेच वास्तव अधोरेखित करतंय... भूक लागली म्हणून डॉन बॉस्को कॉलेजचे सात तरूण विद्यार्थी-विद्यार्थिनी 'सिटी किनारा' हॉटेलमध्ये जातात काय आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात काय... सगळंच हृदय पिळवटून टाकणारं... काळजाचं पाणी पाणी करणारं... 

हातातोंडाशी आलेली ही तरूण मुलं अशी आगीत होरपळून गेल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी फोडलेला हंबरडा हाच सवाल करतोय की, आमच्या या मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण? बेकायदा पोटमाळा बांधणारा हॉटेलमालक की अशा बेकायदा हॉटेल्स आणि फास्ट फूड सेंटरकडे दुर्लक्ष करणारे महापालिकेचे भ्रष्ट अधिकारी? 

स्वस्तात चायनीज फूड देणारी अशी शेकडो हॉटेल्स नियम धाब्यावर बसवून गल्लीबोळात उभी आहेत. अशा हॉटेलांचं कधीतरी फायर ऑडिट होतं का? तिथं घरगुती सिलेंडर वापरले जातात, म्हणून त्यांच्यावर कधी छापे पडतात का? इंटेरिअरसाठी निकृष्ट दर्जाचं सामान वापरलं म्हणून अशा हॉटेलांवर कधी कारवाई होते का? पालिका यंत्रणा आणि फायर ब्रिगेडच्या हलगर्जीपणामुळंच त्या मुलांचे हकनाक बळी गेले, असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का? अशा भ्रष्ट पालिका अधिका-यांवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला नको का? निदान आता तरी या सुस्तावलेल्या यंत्रणा खडबडून जाग्या होतील का? 

ठाण्यात 1998 मध्ये 'लेक व्ह्यू' नावाच्या हॉटेलमध्ये अशाचप्रकारे 10 जणांचा जळून बळी गेला होता. तब्बल 16 वर्षांनी त्या केसचा निकाल लागला... पुराव्याअभावी सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. आता कुर्ल्यातल्या अग्निकांडानंतर पुढचे काही दिवस बेकायदा हॉटेल्सना नोटिसा दिल्या जातील, काहींवर कारवाई केल्याचा ड्रामा केला जाईल आणि पालिका अधिका-यांचे हात ओले केल्यानंतर अशी जीवघेणी हॉटेल्स रस्त्यारस्त्यावर, फुटपाथवर, नाक्या-नाक्यावर पुन्हा सुरूच राहतील... पुढच्या दुर्घटनेची वाट पाहत... हे दुष्टचक्र कधीतरी थांबेल का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.