अमित शहा येणार, शिवसेना नेत्यांना नाही भेटणार

शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव होईल अशी चिन्हं निर्माण झालीत. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. शिवाय निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा 4 सप्टेंबरला मुंबईत येतायत. मात्र शिवसेना नेत्यांना ते भेटणार नसल्यानं युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 1, 2014, 08:06 PM IST
अमित शहा येणार, शिवसेना नेत्यांना नाही भेटणार  title=

मुंबई: शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव होईल अशी चिन्हं निर्माण झालीत. एकीकडे जागा वाटपात निम्म्या जागा मिळाव्यात म्हणून भाजपचे नेते ठाम आहेत. शिवाय निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप अध्यक्ष अमित शहा 4 सप्टेंबरला मुंबईत येतायत. मात्र शिवसेना नेत्यांना ते भेटणार नसल्यानं युतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

गेली अनेक वर्षे एकमेकांसोबत संसार करणाऱ्या शिवसेना भाजपनं अनेक निवडणुका एकत्र लढवल्या. या निवडणुकांआधी शिवसेना भाजपात मतभेदही निर्माण झाले. मात्र हे मतभेद टोकाला जाण्याआधीच दोन्ही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेउन ते वेळीच मिटवले. त्यावेळी सेनेबरोबर भाजपच्या नेत्यांनीही युती टिकवण्यासाठी एक पाऊल मागे घेण्यास कमीपणा मानला नाही. 

एकेकाळी जागा वाटपावरुन वाद झाल्यास शिवसेना आक्रमक होत असे आणि त्यावेळी भाजप नेते समजूत काढण्यासाठी मातोश्रीवर धाव घ्य़ायचे. ही भूमिका आधी प्रमोद महाजन, मग गोपीनाथ मुंडे पार पाडत असत. आता हा दुवा साधणारी मंडळी भाजपात शिल्लक राहिलेली नाहीत. त्यात भाजपमधली परिस्थिती बदललीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे भाजपची सर्व सुत्रे आहेत. महाराष्ट्रासह देशभर भाजपची ताकद वाढलीय, त्यामुळं भाजपचे नेते आता शिवसेनेवरच कुरघोडी करताना दिसतायत. याची सुरुवात मोदींनी केली. मोदींच्या मुंबईत झालेल्या पहिल्या मोठ्या जाहीर सभेत मोदींनी बाळासाहेबांचा साधा उल्लेखही केला नाही. 

लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं त्या जोरावर विधानसभा निवडणुकीत निम्म्या जागांची मागणी भाजपचे नेते करत आहेत. जिथे संधी मिळेल तेथे सेनेला दाबण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून होतोय. या पार्श्वभूमीवपर शिवसेनेनेही विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 288 मतदारसंघात लढण्याची तयारी ठेवलीय. शिवसेनेनं राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक 5 सप्टेंबरला ठेवलीय. 

भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणामुळं उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे नेते प्रचंड दुखावलेत. त्यातच 4 सप्टेंबरला निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत येणारे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शिवसेनेच्या नेत्यांना भेटणार नाहीत. या सगळ्या घ़डामो़डींमुळे शिवसेना भाजपातील संबंध कधी नव्हे एवढे बिघडत चाललेत. याचे पर्यवसान स्वबळावर निवडणूक लढवण्यात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान भाजपनं केलेल्या सर्व्हेत भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल असा निष्कर्ष असून निम्म्या जागा दिल्या तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढण्याची तयारी भाजपनं ठेवलेली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.