मुंबई : छगन भुजबळ राष्ट्रवादीचे असे नेते आहेत, ज्यांनी बाळासाहेबांच्या नेतृत्वातही कामं केलं आहे आणि शरद पवारांच्या नेतृत्वाखालीही ते आज काम करीत आहेत. छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाल्यानंतर, अर्थातच छगन भुजबळ हे अडचणीत आल्याचं म्हणता येईल.
तो खंजीर पार्टनर्सने खुपसला...?
असं म्हटलं जातंय की, जेव्हा समीर भुजबळ यांना अटक झाली तेव्हा, भुजबळांच्या व्हॉटस अॅप वरील प्रोफाईल फोटो बदलला, हा फोटो होतो, 'पाठीत खंजीर' खुपसण्याचा. व्हॉटस अॅप स्टेटस आणि फोटो अनेक वेळा बरंच काही बोलून जातो, भुजबळांनी लावलेला फोटोही तसा बोलका होता.
मात्र समीर भुजबळ यांच्या काही जवळच्या आणि व्यावसायिक भागीदारांनी त्यांना फसवल्याची चर्चा आहे. भुजबळांच्या या व्हॉटस अॅप डीपीचा रोख त्यांच्याकडे तर नसेल ना?, असंही म्हटलं जातंय. तर दुसरीकडे आतापर्यंत राष्ट्रवादी खंबीरपणे भुजबळांच्या पाठिशी उभी नसल्याने,काही लोकांना हा रोख पक्षाकडे वाटतोय, तरी भुजबळांच्या जवळच्या लोकांनी हा रोख पक्षाकडे अजिबात नसल्याचं म्हटलं आहे.
कुछ बदले बदले से पवार साहब...
अजित पवार धरणाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टिकेच धनी ठरले होते, तेव्हा एका पत्रकाराने शरद पवारांना विचारलं होतं. साहेब अजित पवारांवर टीका होतेय, त्यावर आपल्याला काय वाटतं, तेव्हा पवारांनी उत्तर दिलं होतं, महाराष्ट्रात दुष्काळासारखी परिस्थिती असताना तुम्हाला अशा विषयात जास्त रस दिसतोय.
मात्र आज भुजबळांच्या विषयावर पत्रकार परिषदेत मध्येच एका पत्रकाराने दुष्काळावर प्रश्न विचारला, त्यावर पवार म्हणाले, दुष्काळाचा विषय नंतर घेऊ आधी यांच्या प्रश्नाची उत्तर देऊ या.
पवारांना आज बोलायचंच होतं?
आज शरद पवार जेव्हा पत्रकार परिषदेत आले, तेव्हा ही पत्रकार परिषद कशासाठी याचं उत्तर त्यांनी त्यांच्या शैलीत दिलं, मी हयात आहे हे सांगण्यासाठी मी आलोय, असं त्यांनी सांगितलं. तसेच "तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा" असंही पवारांनी म्हटल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
कारण नेहमी मोठ मोठ्याने पवार साहेब... पवार साहेब.... असा आवाज देऊनही न बोलणारे पवार... आज, दिलखुलास आणि बिनधास्त विचारा अशाच पावित्र्यात होते. तेव्हा भुजबळांच्या व्हॉटस अॅप प्रोफाईल फोटोचा हा प्रभाव होता किंवा नाही, यावर चर्चा होती. "मी व्हॉटस अॅप पाहत नसल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलंय".