मनसेनेनं सत्तेसाठी करून दाखवलं

महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मनसे किंग नसली तरी किंगमेकरच्या भूमिकेत दिसली. काल झालेल्या निवडणुकीत मनसेने पाठिंबा दिल्याने तसेच सत्तेत सहभागी होत आपणच सत्तेचं गणित बांधू शकतो हेच दाखवून दिले आहे.

Updated: Mar 22, 2012, 03:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

महाराष्ट्र राज्यातील  जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत मनसे किंग नसली तरी किंगमेकरच्या भूमिकेत दिसली. काल झालेल्या निवडणुकीत मनसेने पाठिंबा दिल्याने तसेच सत्तेत सहभागी होत आपणच सत्तेचं गणित बांधू शकतो हेच दाखवून दिले आहे. जनाधाराचा कौल मान्य करीत पाठिंबा दिल्याचे मनसेचे सांगणे आहे. मात्र, असे असले तरी मनसेने विरोधकांनाच साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

 

ठाण्यात मनसेने शिवसेनेला मदत केली होती. तर नाशिकमध्ये शिवसेनेने पालिका निवडणुकीत मनसेकडे जास्त (४०) जागा असूनही  सेनेने पाठिंबा दिला नाही. याचा वचपा आता मनसेनं सर्वच ठिकाणी काढल्याचं चित्र दिसून आले. औरंगाबाद आणि ठाण्यात मनसे शिवसेना- भाजप महायुतीला पाठिंबा देणार असं वाटत असतानाच, मनसेनं आपलं माप आघाडीच्या पाऱड्यात टाकले.  औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनसेच्या पाठिंब्यानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मनसेनं 2 समित्यांचं अध्यक्षपद पदरात पाडून घेत आघाडीला पाठिंबा दिला.

 

 

मनसेच्या या खेळीमुळं शिवसेना-भाजप युतीची गेल्या १०वर्षांपासूनची सत्ता हातातून गेली आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या नईदाबानो फेरोझ या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विजयाताई निकल या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्यात. ठाणे जिल्हा परिषदेतही मनसे किंगमेकरच्या भूमिकेत दिसली. महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेतही मनसेनं युतीला धक्का देत काँग्रेस आघाडीचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर केला. मनसेनं ठाणे महापालिकेसाठी स्थायी समिती सभापदासाठी आघाडी बरोबर राहण्याचा निर्णय घेतल्यावरच जिल्हा परिषदेमध्येही मनसे आघाडीबरोबर जाणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं होत. ठाणे अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका गायकवाड या तर इरफान भुरे हे उपाध्यक्षपदी विराजमान झालेत.