मनसेतल्या नाराजीचं लोण राज्यभर पसरलं आहे. आजही मनसेच्या नाराजांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती. त्यांची समजूत काढता काढता मनसे नेत्यांच्या अक्षरशः नाकी नऊ आले होते. दुसरीक़डे काळ्या फिती लावून नाराज मनसैनिकांनी मनसेचा निषेध केला.
नाशिक :
मनसेची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर नाशिकमध्येही असंतोषाची ठिणगी पडली. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत नाशिकमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. पैसे पाहून उमेदवारी दिल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून आज निषेध केला. नाराज असलेले बरेचसे कार्यकर्ते उद्या बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणार आहेत. त्यामुळे नवनिर्माणाची स्वप्न पाहणाऱ्या मनसेला नाशिकमध्ये भगदाड पडण्याची शक्यता व्यक्त केली.
पुणे :
पुण्यात प्रभाग क्रमांक ५८ मध्ये राजाभाऊ मासोळेंना उमेदावारी दिल्यानं ४० पेक्षा जास्त मनसे पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर पिंपरीमध्ये मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष यांनीही तिकीट नाकारल्यामुळं बंडाचं निशाण हाती घेतलं आहे.
ठाणे :
ठाण्यात तर मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा गाशा गुंडाळायलाच सुरुवात केली आहे. इतके दिवस राज ठाकरेंचे आदेश मानणारे नितीन भोईर यांनी तिकीट मिळालं नाही म्हणून आता राज ठाकरेंचा फोटोच ऑफिसमधून काढून टाकला आहे. ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप करत मनसे कार्यकर्त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे.
उल्हासनगर :
मुंबई, ठाणे पाठोपाठ उल्हासनगरातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. मनसेनं ३५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. पैशाच्या जोरावर तिकीट दिली गेल्याचा आरोप मनसेच्या उपशहर प्रमुखांनी केला. ७८ प्रभागांपैकी ३५ ठिकाणी मनसे निवडणूक लढवणार आहे. मात्र निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप होत असल्यानं निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची गोची झाली आहे.