औरंगाबाद : मराठवाड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाचा फज्जा उडाला आहे.
शिवसेनेनं या अभियानात मराठवाड्यातील 46 विधानसभा मतदारसंघात 46 आमदारांची नियुक्ती केली होती. यात शिवसेनेच्या स्थानिक संघटनाची चाचपणी करणे, शिवसेना शाखा, महिला आघाडी, युवा सेना कशी काम करते याची पदाधिकाऱ्यांसोबत आमदारांनी पाहणी करणे, असे ठरले होते.
मात्र, प्रत्यक्षात 46 आमदारांची पाहणीसाठी नियुक्ती केली असताना फक्त 15 ते 16 आमदारांनीच या अभियानात सहभाग घेतल्याचं पुढं आलंय. त्यात प्रामुख्यानी मराठवाड्यातीलच आमदार होते, तर मराठवाड्यातील खासदारांनीही हजेरी लावली, बाकी मराठवाड्याबाहेरच्या शिवसेनेच्या आमदारांनी या ना त्या कारणाने या अभियानाला दांडी मारली असल्याचं समोर आलंय.
त्यामुळं उद्धव ठाकरे यांना जो पाहणी अहवाल सादर करायचा होता तो सुद्धा मुंबईहून नेमणूक झालेल्या काही नगरसेवकांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेत झालेल्या बैठकीत सादर केलाय.
मोठा गाजावाजा करीत या अभियानाची सुरुवात मराठवाड्यापासून करण्यात आली होती. मात्र सेनेच्या आमदारांनीच पाठ फिरवल्यानं नक्की हे अभियान कितपत यशस्वी झाले याचीही शंका आहे.