मुंबई/जुन्नर : राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचा नाशिक, पुणे, ठाणे आदी जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. पुणे जिल्ह्यात आंबेगाव येथील माळीण गावावर अख्खा डोंगर कोसळल्याने ५० ते ६० घरे गाडली गेलीत. मुसळधार पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. तर नाशिकमध्ये पाथर्डी येथे इमारतीचा एक भाग कोसळलाय. तर माळशेज घाट आणि कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प आहे.
मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय...धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस बरसतोय... मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झालाय. तर बारवी धरण 70 टक्के भरलंय. सूर्या, वैतरणा, उल्हास नदीला पूर आलाय.
रायगडमध्ये पावसाचा जोर आहे. तर पुण्यातही संततधार सुरू आहे. खडकवासला धरण ओव्हरफ्लो झालंय. तर नाशिकमध्ये गेल्या 32 तासांत मुसळधार पाऊस आहे. दारणा धरण ओव्हरफ्लो झालंय. तर गंगापूर धरण एका दिवसात 18 टक्के भरलंय.
ठाणे जिल्ह्यालाही पावसानं झोडपलंय. कल्याण, डोंबिवली परिसरातही दोन दिवसांपासून संततधार सुरुच आहे. धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस आहे. मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झाला. मोडकसागर 1 लाख 28 हजार दशलक्ष लीटर क्षमतेचा आहे. तर बारवी धरण 70 टक्के भरलंय. 24 तासांत बारवीचा साठा 4 मीटरनं वाढलाय. एका दिवसांत बारवी धरमक्षेत्रात 293 मिमी पाऊस झालाय. मासुरा तलाव भरुन वाहू लागला. तलावाचं पाणी रस्त्यावर आलंय. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल आहे. पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झालीय.
उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे बदलापूर गावाशी असलेला संपर्क तुटलाय. कल्याणमध्येही संततधार पाऊस सुरूय... त्यामुळे पूरसदृष्य परिस्थिती आहे. अनेक घरात पाणी शिरलंय.
कसारा घाटात दरड कोसळलीय. रस्त्यावर पाणीही आलंय. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीय. एकीकडे कसारा घाटात दरड कोसळली असताना कसाराजवळ रेल्वे मार्गावर दरड कोसळलीय.
माळशेज घाटात दरड कोसळळीय.त्यामुळे कल्याण -नगर महामार्ग बंद पडलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.