शिरपूर, धुळे : सोशल मीडियातील लोकप्रिय आविष्कार मानल्या जाणाऱ्या ‘फेसबुक’चा वापर आता मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडेही गेला असून, आई-बापापासून ताटातूट झालेल्या एका मुलाची पुनर्भेट घडविण्यास हे माध्यम कारणीभूत ठरलं आहे.
बोराडीच्या फार्मसी महाविद्यालयातून बेपत्ता झालेला हेमंत चरणदास लांजेवार नागपूरमधील एका हॉटेलात कूक म्हणून काम करीत होता. तपास अधिकारी विजय आटोळे यांनी हेमंतशी फेसबुकवरून चॅटिंग करून त्याचा शोध लावला. तळोदा नगरपालिकेच्या रुग्णालयातील कक्षसेवक चरणदास किसनलाल लांजेवार यांचा हेमंत एकुलता एक मुलगा. १९ सप्टेंबर २००७ रोजी हेमंत कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाला. सात वर्षांत त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
तपास अधिकारी आटोळे यांनी या प्रकरणाच्या १०० पानांच्या अहवालाचा अभ्यास केला. हेमंतचा मित्र सचिन काहीतरी लपवित असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी उलट चौकशी केल्यानंतर त्यानं काही दिवसांपूर्वीच हेमंतशी फेसबुकवरून चॅटिंग केल्याचं सांगितलं. त्यानंतर आटोळे यांनीही फेसबुकवरून हेमंतशी चॅटिंग सुरू केली. त्याचा मोबाइल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. हेमंतनं तो नागपुरात असल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर त्यानं फोन घेणं बंद केलं. त्यामुळं आटोळे यांनी थेट नागपूर गाठलं आणि हेमंत तिथं एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम करीत असल्याचं त्यांना आढळलं. हेमंतला घेऊन ते शिरपूरला आले. हेमंतला भेटल्यानंतर आपला बेपत्ता मुलगा परत आलाय, यावर लांजेवार पती-पत्नीचा विश्वासच बसत नव्हता.
माझ्या वडिलांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांच्यावर माझ्या शिक्षणाच्या खर्चाचा बोजा पडू नये, म्हणून मी घरातून निघून गेलो होतो. आई-वडिलांसमोर परत कसं यावं, हे मला समजत नव्हतं. माझे चाळीसगावचे मित्र सचिन माळी आणि सुरज चौधरी यांच्याशी मी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात होतो, असं हेमंतनं पोलिसांना सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.