नागपूर कारागृहात मुख्यमंत्र्यांसमोरच सापडला मोबाईल

मुख्यमंत्र्यांच्या शहरातील नागपूर कारागृह मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे, कारागृहातील काही कैद्यांनी पलायन केल्यानंतर येथील प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. यानंतर अनेक कैद्यांजवळ मोबाईल सापडले आहेत. येथील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अचानक नागपूर जेलचा दौरा केला आणि त्यांच्यासमोरच एका कैद्याजवळ मोबाईल आढळून आला आहे.

Updated: Apr 21, 2015, 12:59 PM IST
नागपूर कारागृहात मुख्यमंत्र्यांसमोरच सापडला मोबाईल title=

नागपूर : मुख्यमंत्र्यांच्या शहरातील नागपूर कारागृह मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे, कारागृहातील काही कैद्यांनी पलायन केल्यानंतर येथील प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. यानंतर अनेक कैद्यांजवळ मोबाईल सापडले आहेत. येथील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अचानक नागपूर जेलचा दौरा केला आणि त्यांच्यासमोरच एका कैद्याजवळ मोबाईल आढळून आला आहे.

कारागृहातून पळून गेलेल्या पाच कैद्यांचा अद्याप सुगावा लागलेला नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी अचानक मध्यवर्ती कारागृहात धडकले. या भेटीदरम्यान एका कैद्याकडे मोबाईल सापडल्याने अधिकाऱ्यांची आणखीच तारांबळ उडाली. मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले. 

वाडी आणि मोवाड नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस सध्या नागपुरात आहेत. त्यांनी आज सकाळी विमानतळावरून थेट मध्यवर्ती कारागृहाकडे गाडी वळविली. त्यांच्या नियोजित दौऱ्यात या भेटीचा समावेश नव्हता. ताफ्यातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती नव्हती. 

कारागृहात फडणवीस आल्यानंतर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या वेळी त्यांनी कैदी पळून गेलेल्या जागेची पाहणी केली. तुरुंगातील कामकाजाची माहिती जाणून घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही सूचना केल्या. 

मात्र, फडणवीस कारागृहात फेरफटका मारत असतानाच एका कैद्याकडे मोबाईल आढळला. तो अधिकाऱ्यांनी लगेच जप्त केला. एका अधिकाऱ्याने याबाबत त्यांना माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून कारागृहात दररोज मोबाईल सापडत आहेत. 

कारागृहाच्या भेटीसंदर्भात फडणवीस यांनी माहिती ट्विट केली. यात त्यांनी मध्यवर्ती कारागृहात अनेक सुधारणा करण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले. पाच कैदी पळून गेले याबाबत धक्कादायक माहिती आपण लवकरच उघड करणार असल्याचे ते म्हणाले. 

वॉच टॉवरवरील पोलिस झोपा काढतात 
काही दिवसांपूर्वी मीरा बोरवणकर यांनी आकस्मिक भेट दिली असताना पाच पोलिस कर्मचारी झोपलेले आढळले होते. धक्‍कादायक म्हणजे यात वॉच टॉवरवरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पलायनाच्या घटनेनंतर तीन बडे अधिकारी आठवडाभर शहरात होते. त्यांनीही कारागृहाची झाडाझडती घेतली. तरीही मोबाईल आढळत असल्याने प्रशासनात काहीच सुधारणा झाली नसल्याचे स्पष्ट होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.