अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर: दुकानातून तुम्ही एखादा बिस्कीटाचा पुडा किंवा केक असे खाद्यपदार्थ घेत असाल तर सावधान... त्या पुड्याची एक्स्पायरी डेटही संपलेली असू शकते. विशेष म्हणजे एक्स्पायरी डेट संपलीय याची माहितीच तुम्हाला मिळू शकणार नाही.
बिस्कीटं, केक पाहून लहान मुलांना त्याचा मोहं होणं अगदी स्वाभाविक आहे. पण जरा जपून.. तुम्ही खाताय ती बिस्कीटं आणि तत्सम अन्नपदार्थ मुदतबाह्य म्हणजेच एक्स्पायरी डेट उलटलेले असू शकतात. अशा खाद्यपदार्थांचा मोठा साठाच एफडीएनं उघड केलाय. शहरातल्या शास्त्रीनगर भागात एका कंपनीच्या अधिकृत विक्रेत्याच्या कार्यालयावर छापा टाकला तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झालाय. फक्त बिस्कीटच नाही तर केक, वेफर्स, नमकीन आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीसाठी इथे साठवले होते. २०१३ किंवा २०१४ मध्येच यांचा साठा संपला होता. तरीही तो विक्रीसाठी इथे साठवण्यात आला होता. पदार्थाच्य़ा पाकीटावर असलेली एक्स्पायरी डेट रसायनाच्या माध्यमातून पुसून नवी तारीख टाकण्याचा गोरखधंदा केला जात होता.
विशेष म्हणजे अशा मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांचा वापर पाळीव प्राण्यांच्या खाद्यासाठी केला जातो. या पदार्थांची भुकटी करून ते प्राण्यांच्या खाण्यासाठी वापरले जातात. पण कंपनीच्या नियमांची पायमल्ली करत हे पदार्थ सर्रास विकले जात आहेत. एफडीएच्या अधिका-यांनी १२ लाख रूपये किंमतीचा माल जप्त केलाय. हा माल डंपिंग ग्राऊंडमध्ये नष्ट करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास नंदनवन पोलीस करत आहेत. कंपनीचा डीलर योगेश ग्वालानी याला अटक होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि एफडीए कारवाई करत असले तरी तुम्ही सावध राहा... यापुढे कोणताही पाकीटबंद पदार्थ घेताना सावध राहा... एक्स्पायरी डेट तपासून घ्या... तुम्हाला जराही संशय आला तरी दुकानदाराला त्याबाबत जाब विचारायला संकोच करू नका.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.