सिंधुदुर्ग: सावंतवाडीतल्या कळसूलकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी आज बेमुदत आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पायाभूत सुविधाही पुरवल्या जात नसून याला सर्वस्वी शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. मुलांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. तसंच शाळेच्या इमारतीचीही दूरवस्था झालीय. इमारत कोसळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडीमधली 113 वर्षे जुनी कळसूलकर शाळेची इमारत. या शाळेत शिक्षण घेतलेले अनेक जण आज मोठ मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. मात्र शाळेची इमारत सध्या अतिशय जीर्ण झालीय. इमारतीची देखभालही केली जात नाहीये. जी काही दुरूस्ती झाली त्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. शाळेत स्वतःची प्रयोगशाळा नाही. स्वच्छता गृहांची अवस्थाही गंभीर आहे. विद्यार्थ्यांना दूषीत पाण्याचा पुरवठा केला जातोय. वर्गातल्या भिंतींना तडे गेलेत. त्यामुळं विद्यार्थी जीव मुठीत धरून अभ्यास करत आहेत. या विरोधात आता शाळेचे माजी विद्यार्थी सरसावले आहेत. माजी विद्यार्थ्यांनी लाक्षणिक आंदोलन करत समस्येला वाचा फोडलीय.
प्रशासन तातडीनं बरखास्त करा अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांनी केलीय. सावंतवाडीच्या माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर तसंच विद्यमान उप नगराध्यक्ष राजन पोकळे ही मंडळी शाळेचं प्रशासन चालवत आहेत.
यासंदर्भात तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन माजी आमदार दीपक केसरकर यांनी दिलंय. सावंतवाडीतली ही 113 वर्षे जूनी शाळा ही सावंतवाडीचं भूषण आहे. तिची तातडीनं देखभाल दुरूस्ती होणं गरजेचं आहे. फक्त सावंतवाडीतली नाही तर आसपासच्या भागातली मुलंही या शाळेत शिकतात. त्यामुळं या शाळेची निगा राखणं ही तातडीची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.