अलिबाग : येथे नगर पंचायत निवडणुकीत भाजपचे पानिपत झाले. तर एका ठिकाणी शेकापने जोरदार मुसंडी मारली. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले गड शाबुत राखल्याचे निकालावरुन स्पष्ट झालेय.
रायगड जिल्ह्यात नव्याने निर्माण झालेल्या ५ नगर पंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यात शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस या प्रस्थापीत राजकीय पक्षांनी आपापले बालेकिल्ले राखले असले तरी खालापूरात शिवसेनेला धक्का देत शेकापने लालबावटा फडकवला आहे.
अधिक वाचा : रत्नागिरीत पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी
पोलादपूर आणि तळा नगरपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला तर म्हसळा आणि माणगाव या दोन्ही ग्रामपंचायती राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. खालापूर ग्रामपंचायतीवर यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती . नगरपंचायत निर्माण झाल्यानंतर मात्र शेकापने शिवसेनेचा धुवा उडवत सत्ता प्रस्थापीत केली आहे.
माणगाव नगरपंचायत जिंकण्यासाठी शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावून ही नगरपंचायत राखण्यात यश मिळवले. राज्यात सत्तेत असलेल्या भाजपाने जिल्ह्यात १९ ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. परंतु त्यांना भोपळाही फोडता आला नाही.