निखील चौकर, झी मीडिया, अहमदनगर : रेल्वे स्थानकातिल स्वच्छते बाबतीत देशभरात घेतलेल्या सर्व्हे मधे अहमदनगर रेल्वे स्टेशनने रेल्वे स्थानकाच्या गटात देशभरात तिसरा क्रमांक पटकावलाय.
देशभरातील 'अ' दर्जाच्या ३३२ रेलवे स्थानकात मार्च महिन्यात क्वालिटी काऊन्सिल ऑफ इंडियाने सर्वे केला होता. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर रेल्वे स्थानकाला देशात तिसरा क्रमांक मिळालाय. या यशाचे खरे श्रेय रेल्वे स्थानकामधील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना द्यायलाच हवं...
स्वच्छता सर्वेक्षणात साफसफाई सोबतच खाद्यपदार्थ स्वच्छता, प्रतीक्षा गृह स्वच्छता या सर्व बाबींची पाहणी समितीमार्फत होते. विशेष म्हणजे पाहणी वेळी प्रवाशांकडून ऑनलाइन पद्धतीनं स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदवले जातात.
अहमदनगर रेल्वे स्टेशन गेल्या वर्षी स्वच्छतेत देशात ३७ व्या क्रमांकावर होते. मात्र यंदा स्वास्थ्य विभाग आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानामुळे यंदा तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतलीय.
देशात 'अ' स्थानकात पंजाबमधील बिहासनं प्रथम तर तेलंगानाच्या मफाफा रेल्वे स्टेशननं दुसरा क्रमांक पटकावलाय. आता पुढील वर्षी देशपातळीवर अव्वल क्रमांकावर येण्यासाठी जिद्दीनं काम करू असं इथल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना विश्वास आहे. मात्र, दुसरीकडे अहमदनगर स्टेशनचा स्वच्छतेचा ठेका खाजगी संस्थेला दिला जाणार आहे. त्यामुळे खाजगी ठेकेदार यासाठी किती प्रयत्न करणार, यावरच हे यश अवलंबून असणार आहे.