निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - खडसे, तावडे

शिवसेना-भाजप युती तुटल्याने कार्यकर्ते खुश होते. आम्हाला चांगले यश मिळेल. भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही जागा कमी पडल्यास भाजप कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाणार नाही, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 

Updated: Oct 16, 2014, 07:43 PM IST
निकालानंतर राष्ट्रवादीसोबत जाणार नाही - खडसे, तावडे title=

मुंबई : शिवसेना-भाजप युती तुटल्याने कार्यकर्ते खुश होते. आम्हाला चांगले यश मिळेल. भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल. मात्र, बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही जागा कमी पडल्यास भाजप कोणत्याही स्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाणार नाही, असे भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यात सरकार बनविण्यात राष्ट्रवादी महत्वाची भूमिका बजावेल, असे मत ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपने पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला.

विविध एक्झिट पोलनी भाजप राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तविली आहे. काहींनी भाजपच्या नेतृत्त्वाखाली महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर काहींनी भाजपला सत्ता प्राप्त करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावीच लागेल, असे म्हटले आहे. 

त्यामुळे भाजपचा गोटात आनंद आहे. आम्ही कोणाचीही मदत घेणार नाही. राष्ट्रवादीची सोडाच शिवाय शिवसेनेची नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही वेळप्रसंगी आम्ही विरोधात बसू मात्र, कोणालाही बरोबर घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप कोणाची मदत घेणार, यावरून विविध तर्क लढविले जात आहेत. प्रचाराच्या काळात शिवसेनेने भाजपवर सडकून टीका केली होती. त्यामुळे आता मतमोजणीनंतर दोघे एकत्र येतील का, शिवसेना भाजपला पाठिंबा देईल का, असे प्रश्न पुढे येऊ लागले आहेत.  

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यात मतदान झाले. मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे, हे आता येत्या रविवारी १९ तारखेला मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.