मुंबई : एक्झिट पोलपाठोपाठ, आता सट्टेबाजांनीही भाजपच्याच पारड्यात महाराष्ट्रातील सत्तेचा कौल टाकलाय... महाराष्ट्रात काय नवीन समीकरणं असतील आणि कोण मुख्यमंत्री होईल, याबाबत सट्टेबाजांची गणित मांडणारा हा रिपोर्ट. महाराष्ट्रात भाजपलाच सर्वाधिक जागा मिळणार, याबाबत सट्टेबाजांनीही शिक्कामोर्तब केलंय
- भाजपला १२५ ते १३५ असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केला असून, १५ पैसे भाव लावलाय.
- शिवसेनेला ५५ ते ६५ जागांसाठी सट्टेबाजांनी १२ ते १५ पैसे भाव लावलाय.
- काँग्रेसला ६५ ते ७२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवत सट्टेबाजांनी काँग्रेसवर २० पैसे भाव लावलाय.
- तर २७ ते ३४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील असं सट्टेबाज़ म्हणतायेत. राष्ट्रवादीवर सट्टेबाजांनी १६ पैसे भाव लावलाय.
- मनसेला ९ ते १४ च्या पुढे जागा मिळणार नाहीत, असा त्यांचा अंदाज आहे. सट्टेबाजांनी मनसेवर एक रुपयाला १२ पैसे असा सट्टा लावलाय.
- तर अपक्षांना १०च्या आत जागा मिळतील, त्यावर १३ पैसे भाव लावलाय.
भाजप शिवसेना युती होईल असा अंदाज सट्टेबाजांच्या एका गटाने वर्तवला असून त्यावर एक रुपयाला २० पैसे असा
भाव सट्टेबाजांनी दिलाय. तर भाजप आणि शिवसेना यांची युती होणार नसल्याचं दुस-या सट्टेबाज गटाचं म्हणणं आहे. त्यासाठी सट्टेबाजांनी युतीवर एक रुपयाला १० पैसे असा भाव लावलाय. या अंदाजानुसार युती होणं तूर्तास शक्य नसल्याचं दिसतंय. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवेसेनेलाही सत्तेबाहेर ठेवण्याचा भाजपचा मानस असल्यानं नवीन युती जन्माला येईल, असा सट्टेबाजांचा कयास आहे. त्यासाठी भाजप "मरे हुए पार्टी को साथ लेगा" असा अंदाज सट्टेबाजांनी व्यक्त केलाय. त्यावर 7 पैसे सट्टा लागलाय.
मुख्यमंत्री भाजपचाच होणार यावरही सट्टेबाज ठाम आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावाला सट्टेबाजांनी जास्त पसंती दिलीय. गडकरींसाठी एका रूपयाला 12 पैसे भाव आहे. त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर 14 पैसे, एकनाथ खडसेंवर 25 पैसे, तर डार्क हॉर्स सुधीर मुनगंटीवार यांच्यावर 30 पैसे भाव लावण्यात आलाय.
आता सट्टेबाजांचा हा अंदाज किती खरा ठरतो, यासाठी 19 ऑक्टोबरच्या मतमोजणीची वाट पाहावी लागणार आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.