UPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे

 आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.

Updated: Oct 12, 2014, 09:48 PM IST
UPDATE – राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुततो, पुसतो, जाळा, बलात्कार करण्याची भाषा- राज ठाकरे title=

मुंबई:  आज विधानसभा निवडणूक २०१४ प्रचाराचा अखेरचा रविवार आहे. मतदानाला अवघे दोन दिवस उरले आहेत. अशात आज सर्वच पक्षांचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलाय. सर्वच महत्त्वांच्या नेत्यांच्या ४-५ सभा आहेत. तर अनेक नेते आपल्या मतदारसंघात ठिय्या मांडून आहेत. प्रत्येक जण एकमेकांवर तोंडसुख घेतांना दिसतायेत.

बलात्कार करा, मुततो, जाळतो, पुसतो... राज ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका

भायखला, गिरगाव: राज ठाकरेंची राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कडाडून टीका... एक नेता म्हणतो पहिले आमदार व्हा मग बलात्कार करा, दुसरा म्हणतो तुमच्या धरणार पाणी नाही तर मी काय मुतू का? तिसरी शरद पवारांची मुलगी म्हणते मंत्र्यांच्या गाड्या जाळा, मग तिला कळलं वाटतं आपणही त्याच पक्षात आहोत ज्यांचं सरकार आहे... तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात बोटावरची शाई पुसून दोन वेळा मतदान करा... अशी वक्तव्य करणारे हे राष्ट्रवादीचे नेते.. या शब्दात राज ठाकरेंनी एनसीपीवर टीका केली. 

भाजपकडे जाहिरातींसाठी इतका पैसा आला कुठून- अजित पवार

पुणे: मोदी सरकारनं लोकसभा निवडणुकीवेळी १०० दिवसांत काळा पैसा भारतात आणण्याची घोषणा केली होती. पण आता सरकार येऊन ६ महिने झाले. या घोषणेचं झालं, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विचारलाय.  ते पुण्यात बोलत होते. तसंच भाजपकडे जाहिरातींसाठी इतका पैसा आला कुठून. भाजपच्या जाहिरात खर्चाची माहिती आरटीआयमध्ये मिळायला हवी, असंही अजित पवार म्हणाले. 

मोदींनी आपल्या मंत्रालयाची माहिती काढावी - पवार

काळाचौकी, मुंबई: काका शरद पवारांनी आपल्या काळाचौकी इथल्या सभेत मोदींवर शरसंधान साधलंय. मोदींनी आपल्या मंत्रालयाची माहिती काढावी. गुजरात- महाराष्ट्राचा आलेख पाहावा. महाराष्ट्र कुठे आहे त्यांच्या ज्ञानात त्यानं भर पडेल. महाराष्ट्र गुजरातच्या पुढेच आहे. भाजपतर्फे महाराष्ट्राचं बेसून चित्र मांडलं जातंय. 

सत्ता आल्यावर महिलांच्या, तरुणांच्या हक्कासाठी लढू - आदित्य

येवला:  आमची सत्ता आल्यावर आम्ही महिलांच्या आणि तरुणाच्या हक्कासाठी लढू असा निर्धार शिवसेनेच्या युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केलाय. येवल्यात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. तसंच सगळीकडे भगवे वादळ दिसत असून शिवसेना दीडशेचा आकडा नक्की पार करेल असा आशावाद आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय..

धरणात मुतायची भाषा करणाऱ्यांबरोबर मी कसं राज्य केलं असेल? – पृथ्वीराज 

इचलकरंजी: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इचलकरंजीत झालेल्या काँग्रेसच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी नेते आर.आर. पाटील आणि अजित पवार यांच्यावर तोफ डागली. धरणात मुतायची भाषा करणाऱ्यांबरोबर मी कसं राज्य केलं असेल, याचा तुम्हीच विचार करा. असं म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी आता पूर्ण सत्ता द्या असं मतदारांना आवाहन केलं. 

आघाडी सरकारचं हे अखेरचं वर्ष - मोदी

पंढरपूर: प्रचाराच्या सुपर संडेला नरेंद्र मोदींनी पंढरपूरात सभा घेतली. २०१४ हे वर्ष आघाडी सरकारचं शेवटचं वर्ष असेल असं म्हणत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर पुन्हा सडकून टीका केली. आघाडी सरकार शेतक-यांना पाणी देण्यात अपयशी ठरल्यानं राज्यात शेतकरी आत्महत्या झाल्या मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला त्याचं काही सोयरं सुतक नसल्याची टीका त्यांनी केलीये.

NCP म्हणजे ‘नॅचरली करप्ट पार्टी’ – मोदी

तुळजापूर: तुळजापूरच्या सभेत नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. मोदींनी आपल्या भाषणात NCP म्हणजे ‘नॅचरली करप्ट पार्टी’ अशी खिल्ली उडवलीय. 
 
दिल्लीश्वरांसमोर शेपूट हलवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको – उद्धव

दापोली: दिल्लीश्वरांसमोर शेपूट हलवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको असं म्हणत उद्धव ठाकरेंनी दापोलीत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काही टक्के वीजेसाठी शंभर टक्के धोका देणारा प्रकल्प आम्हाला नको असं म्हणत त्यांनी जैतापूर प्रकल्पालाही विरोध केला. शिवसेना उमेदवार सुर्यकांत दळवी यांच्या प्रचारासाठी ते दापोलीत आले होते.

आर. आर. पाटलांचं वक्तव्य संतापजनक - शरद पवार

मुंबई: आर. आर. पाटीलांनी सांगलीमध्ये केलेल्या संतापजनक वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी तीव्र शब्दात निंदा केली आहे. तसंच आर. आर. पाटिलांची भूमिका ही पक्षाच्या भूमिकेशी विसंगत असल्याचंही पवार म्हणाले. निवडणूक असो वा नसो, असं वक्तव्य चुकीचं असल्याचंही पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.

भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

कराड: कोल्हापूर जिल्ह्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गिरगावमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत दहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. भाजपचे उमेदवार अमल महाडीक आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली. यावेळी धारधार शस्त्रांचा वापर करण्यात आला. 

राज्यात पैशाचा पाऊस, पुणे,वर्धा, नाशिक रोखक पकडली

नवी मुंबई: निवडणुकीचा प्रचार संपायला एक दिवस शिल्लक असताना राज्यात पैशाचा पाऊस पडतोय. नवी मुंबईतील खारगर इथं अडीच लाखांची रक्कम सापडलीये. पुणे जिल्ह्यातल्या शिरुरमध्ये पाच लाख रुपये जप्त करण्यात आलेत. तर नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये पाच लाख आणि सटाण्यात ७ लाख पकडलेत. वर्ध्यामध्ये पाच लाखांची रोकड. तर सांगलीमध्येही पाच लाखांची रक्कम पकडण्यात आलीय. नागपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेच्या पूर्वीसंध्येला १० लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये.

नितिन सरदेसाईंच्या प्रचारासाठी राज ठाकरे रस्त्यावर

मुंबई: माहिम मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार नितिन सरदेसाई यांच्या प्रचारात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे य़ांनीही सहभाग घेतला. विशेषम्हणजे शिवसेना भवनापासून सुरु झालेल्या या रॅलीत राज ठाकरे सेनाभवन ते रानडे रोडपर्यंत चालत गेले. त्यामुळं रॅलीत सहभागी झालेल्या हजारो मनसे कार्यकर्त्यांना आणखीनच जोश आला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.