Kolhapur : कोल्हापूरच्या महावीर गार्डनमदी आज लय निराळीय तऱ्हा बगाय मिळाली. कुनी तोंडाला रुमाल बांदलाय, कुनी हेल्मेट घातलंय, कुनी उन्हापासनं जरा वळचनीला सावलीला बसलंय. ही समदी मानसं कसली वाट बगत्यात म्हनून आमी जरा वाट वाकडी केली. तवा कळलं हीतं टक्कल पडलेल्या लोकांवर लय जालीम उपाय सुरु हाय. म्हनून तर आसल्या
टळटळीत उन्हात तुळतुळीत टक्कलं घिऊन ही समदी मानसं आपल्या नंबरची गपगुमान वाट बगत बसल्यात. न्हायतर कोल्हापुरची मानसं अशी शांत बसलेली कुटं बगितल्यात व्हय. थोड्या येळानं या महावीर गार्डनमंदी सलमान सेफी नावाचा एक तरणाताट वैदू आला. सवताचे झुपकेदार केसं सावरत त्यानं एका एका टाकलावर कसंलतरी औषद लावाय सुरुवात केली.
औषध लावणारं प्रत्येक जन आता आपलं टक्कल जानार आणि क्यास येनार म्हणून लयच हारकलेलं दिसत व्हतं. कोल्हापुरात या टकलावरचं औषीद लावून घ्याला फकस्त कोल्हापुरातनंच न्हाय तर आक्शी मुंबई पुनं आणि थेट दिल्लीवरनं मानसं आपलं टक्कल घिऊन आलती. पॉईट चा मुद्दा म्हनजी टक्कल घालवायचं हे औषध सलमान सेफी आगदी फुटक लावून देत्यात.
टक्कलमुक्तीसाठी रांगा
अगदी भल्या पाटचं उटून इथं म्हाताऱ्या कोताऱ्यापासनं अगदी पंचविशी तिशीतली केसं गेलेली पोरं येतेत. त्यांच्या टकलावर सलमान सेफी हे आयुर्वेदीक आवषद लावतुय. त्याचा फायदा बी हुतुय असं लय जनांनी आमास्नी सांगिटलं.
सलमानला कोल्हापुरात कोणी आणलं?
लय दिसापासनं कोल्हापुरातल्या महावीर गार्डनमधी अशीच टकल्यांची जत्रा भरतीय. आनि जशी ही बातमी पसरलीया. तवापासनं तर काय इचारू नगा. जो त्यो महावीर गार्डनचा पत्ता इचारालाय. खरंतर सलमानला शिवसेनेचं नगरसेवक राहूल चव्हाणांनी कोल्हापुरात आणलं. कारण काय तर टकलामुळं इथं लय पोरांची लग्नच ठरनात. म्हनून सलमान वैदूंना खास इकडं आनलंय.
डोक्यावर चार केसं आसली की उरात कॉन्फीडन्स आसतुया. पन टकलामुळं ना कुनी पोरगी देतंय, ना नोकरी कामात लक्ष लागतंय. पन आता कोल्हापुरातल्या या फुटक औषिद देनाऱ्या सलमान वैदूबाबाच्या दाव्यानं अनेक तरुण आणि म्हाताऱ्यास्नीबी जरा तरतरी आल्या. खरंच या औषदाचा काय फायदा हुतू की नाय हे औषध देनाऱ्या आणि घेनाऱ्यास्नीच ठावं. मातूर आपल्याबी टकलावर हिरवळ इल या आशेनं आता अनेक टक्कल बहाद्दरांची पावलं आता कोल्हापुरला वळाय लागल्यात.