न्यूयॉर्क : देशातील नरेंद्र मोदी सरकारने आपली वर्षपूर्ती थाटामाटात साजरी करण्यास सुरूवात केली आहे, मात्र देशातील शेतकऱ्यांचा सूर हा मोदी सरकारविरोधी आहे, असं अमेरिकन माध्यमांनी म्हटलं आहे.
भारतीय मीडियाने मात्र मोदींची ही वर्षपूर्ती डोक्यावर घेतल्याची टीका होत आहे. ग्रामीण भागातही शेतीमालाचे भाव आणि भूसंपादन कायद्यातील दुरूस्ती यावरून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे, ही नाराजी भारतीय मीडियात दिसून आलेली नाही, मात्र अमेरिकन मीडियाने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं आहे.
काय म्हणतेय अमेरिकन मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक वर्षाचा कार्यकाळ केल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षण करताना अमेरिकेमधील माध्यमांनी म्हटलंय, 'मेक इन इंडिया‘ या मोदींच्या प्रसिद्धीचा मह्तावाचा भाग आहे. अवास्तव अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर देशातील रोजगार निर्मिती अजूनही सुस्तावस्थेतच आहे. अमेरिकन माध्यमांचे मत आहे.
अमेरिकेमधील अत्यंत महत्त्वपूर्ण वृत्तपत्र असलेल्या वॉलस्ट्रीट जर्नलने मोदींच्या वर्षपूर्तीनिमित्त आता जल्लोषाचे वातावरण संपून आव्हानांचा काळ सुरु झाल्याचे म्हटले आहे.
'मोदी यांना भारतीय मतदारांनी आर्थिक प्रगती आणि बदलासाठी सत्ता सोपवून आता एक वर्ष झाले आहे. आता सरकारच्या मार्गामध्ये अनेक आव्हाने उभी राहू लागली आहेत. देशातील उत्पादनाचा आलेख उंचावण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या मेक इन इंडिया मोहिमेस आतापर्यंत प्रसिद्धीच जास्त मिळाली आहे. मात्र त्या तुलनेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा दिसून आलेली नाही,' अशा आशयाची भूमिका वॉल स्ट्रीट जर्नलने घेतली आहे.
न्यूयॉर्क टाईम्सने या वृत्तपत्रानेही मोदी यांनी सत्याचा सामना करावयास हवा, असे म्हटले आहे. 'परदेशामधून पाहिले असता भारताची कामगिरी उज्वल दिसते. या वर्षी भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे. मात्र भारतामध्ये अद्याप रोजगार निर्मिती सुस्तावस्थेत आहे.
मोदी यांच्याविषयी देशात असलेल्या अवास्तव अपेक्षा हा सर्वांत मुख्य अडथळा असल्याचे मत न्यूयॉर्क टाईम्सने या पार्श्वभूमीवर व्यक्त केले आहे. देशातील उद्योगविश्व अजूनही कुंपणावर आहे. त्यातच मोदी यांना देशातील विरोधकांनी गरीबविरोधी आणि शेतकरीविरोधी ठरविले आहे,' असे न्यूयॉर्क टाईम्सने स्पष्ट केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.