नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय सैन्यानं केलेल्या हल्ल्यानंतर आता दिल्लीत हालचाली वाढल्यात. एकीकडं आपली नाचक्की लपवताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आलेत... तर दुसरीकडं पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताला यश आलंय.
उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं गुरूवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताच्या या मुँहतोड जवाबामुळं पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकलीय. या कारवाईत भारतीय जवान धारातीर्थी पडल्याचा बनाव पाकिस्तानी मीडियाच्या माध्यमातून करण्यात आला. पण भारतीय लष्करानं हे दावे खोडून काढलेत. या संपूर्ण कारवाईत केवळ एक भारतीय जवान किरकोळ जखमी झाल्याचं समजतंय. तर ३७ राष्ट्रीय रायफल्सचा एक जवान अनवधानानं पाकिस्तान हद्दीत गेल्याचा खुलासा लष्करानं केलाय.
भारतानं केलेल्या या सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्ताननं पुरावे नष्ट करण्यासाठी धावपळ सुरू केलीय. 'लाईन ऑफ कंट्रोल'च्या पलीकडं मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवर लपून छपून दफनविधी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरु झालाय. याशिवाय गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार हाफिज सईद आणि मसहूद अझरला तूर्तास भारताविषयी गरळ ओकण्याचं सत्र बंद करण्याची सक्त ताकीद देण्यात आलीय.
दरम्यान, भारत-पाक सीमेवरील हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी पुन्हा एकदा कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक झाली. गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, पररराष्ट्र मंत्रा सुषमा स्वराज यावेळी उपस्थित होते. गृह आणि संरक्षण खात्याचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीत सहभागी झाले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही लष्कराच्या कारवाईचं कौतुक केलंय. गेल्या अडीच वर्षांत नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान असल्यासारखे वागले, असं राहुल गांधी म्हणाले.
भारत आणि पाकिस्तान संबंधामध्ये तणाव निर्माण झाला असताना, अमेरिकेसोबत मात्र मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यात भारताला यश आलंय. भारत-अमेरिका मैत्रीचे संबंध आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहचल्याचं अमेरिकन संरक्षण मंत्री अॅश्टन कार्टर यांनी म्हटलंय. याचाच अर्थ आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानची कोंडी करण्यात भारताचे डावपेच यशस्वी झाल्याचं मानलं जातंय.