www.24taas.com, नवी दिल्ली
आता पुन्हा कोणत्याही बँकेतून कितीही वेळा पैसे काढण्याबद्दल भरावं लागणारं शुल्क बंद होण्याच्या मार्गावर आहे. व्हाईट लेबल एटीएमच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे.
देशात बँकिंग सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालय नव्या सेवा सुविधांवर विचार करीत आहे. बँकांच्या विस्तारावर मर्यादा असल्या तरी नव्या संकल्पना वापरून बँकेच्या सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने आता व्हाईट लेबल एटीएम सुविधा सुरू करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालय गांभीर्याने विचार करीत असून, लवकरच अशी सेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. रिझर्व्ह बँकेने अशी एटीएम सेवा सुरू करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. परंतु, ही सुविधा सुरू करण्याबाबत खासगी बँकांनी रिझर्व्ह बँकेवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. बँका नव्हे तर बँकेतर कंपन्या हे एटीएम लावणार आहेत. रिझर्व्ह बँकेने मुथूट फायनान्ससह दोन कंपन्यांकडे हे काम सोपवले आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, व्हाइट एटीएममधून कोणत्याही बँकेच्या कार्डद्वारे कितीही वेळा नि:शुल्क पैसे काढता येतील. सध्या इतर बँकेच्या एटीएममधून महिन्याकाठी पाच वेळाच पैसे काढता येतात
व्हाईट लेबल एटीएम सेवा ही खऱ्या अर्थाने ग्राहकांच्या दारापर्यंत जाणारी सेवा आहे. व्हाईट लेबल एटीएम ही बँकांच्या मालकीची नसतील तर ती बँकांच्या सुविधा पुरविणारा दुवा म्हणून काम पाहू शकतील. या एटीएममधून कितीही वेळा आणि कोणत्याही बँकेत खाते असले तरी पैसे काढता व भरता येतील.